अमेरिकेचे अपयश चीनच्या नेतृत्वकांक्षेला उभारी देणारे ?
गेल्या दोन दशकांमध्ये अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या नेतृत्वाला आर्थिक व अन्य पातळीवर अपयशाची किनार लाभत आहे. याचवेळी जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेला घुमारे फुटत आहेत. रशियाच्या मदतीने चीनचा हा नेतृत्व उदय होत असून येणारे दशक त्याची दिशा ठरवेल अशी सद्यस्थिती आहे. या नव्या जागतिक घडामोडींचा हा धांडोळा.
गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक पातळीवर विविध प्रकारची संकटे निर्माण झाली. अगदी दोन वर्षांपूर्वीच्या करोना महामारीपासून विविध तंत्रज्ञानाची, अर्थव्यवस्थेची संकटे जगाने अनुभवली. आर्थिक आणि लष्करी महासत्ता असलेल्या अमेरिकेला जागतिक नेतृत्व करण्याची संधी अनेक दशके लाभली आहे . मात्र अमेरिकेचे जागतिक नेतृत्व हळूहळू लोप पावत असून त्यांची लोकप्रियता उतरंडीला लागलेली आहे. त्यामुळेच चीनला आता जागतिक नेतृत्वाचे घुमारे फुटत आहेत. अमेरिकेचा प्रमुख शत्रू असलेल्या रशियाच्या मदतीने चीन जागतिक पातळीवर नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली संकटे आणि त्याला समर्थपणे तोंड देण्यामध्ये कमी पडलेले अमेरिकेचे नेतृत्व होय.
गेल्या चार-पाच दशकांचा इतिहास पाहिला तर 1990 च्या सुमारास आशियाई देशांतील वित्तीय संकट, 2000 मध्ये म्हणजे 21व्या शतकाच्या उंबरठ्यावरचे डॉट कॉम संकट; 2008 मधील जागतिक मंदीचे संकट; युक्रेन- रशिया यांच्यातील वर्षभरापेक्षा जास्त काळ लांबलेले युद्ध; काही खंडामध्मे दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी,महापूर अशा विविध संकटांना जगाला सामोरे जावे लागले. काही संकटे निसर्गनिर्मित होती परंतु त्याला जबाबदार मानव जात आहे. पर्यावरणाचा -हास, लालसेपोटी निसर्गाला ओरबडण्याची प्रवृत्ती यापोटी हे घडत आहे. त्याचप्रमाणे अनेक देशांना अमेरिकेच्या “दादागिरी ” समोर झुकावे लागले आहे. जागतिक बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (आएएमएफ ) किंवा संयुक्त राष्ट्र संघाचे निर्णय यामध्ये अमेरिकेचा असणारा दबाव टाळता आलेला नाही. या सर्व जागतिक संघटना अमेरिकेच्या छत्रछायेखाली आजवर राहिल्या.
आज जगातील अग्रगण्य देश व त्यांची अर्थव्यवस्था लक्षात घेतली तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची अर्थव्यवस्था 23 ट्रिलियन डॉलर्स च्या घरात असून त्या खालोखाल चीनची अर्थव्यवस्था 18 ट्रिलियन डॉलरची आहे. या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था फक्त 3 ट्रिलीयनच्या घरात आहे. जागतिक ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाचा(जीडीपी) विचार करता अमेरिकेचा त्यात 41.83 टक्के तर चीनचा 34.75 टक्के वाटा आहे. कृषि उत्पादन, कमी खर्चाचे औद्योगिक उत्पादन या क्षेत्रात चीनने अमेरिकेला बरेच मागे टाकले आहे. माहिती तंत्रज्ञान व त्यावरील विविध उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात चीन अमेरिकेच्या पुढे आहे. संगणक उत्पादन, वाहन उत्पादन तसेच सेमी कंटक्टर्स उत्पादन यामध्ये चीनची मोठी आघाडी आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रातही , संरक्षण यंत्रणा निर्मितीत चीनचाच बोलबाला वाढत आहे. पेटंट घेण्यातही चीनची मोठी आघाडी आहे. दोघांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तरी अमेरिकेचे एकूण कर्ज 31.45 ट्रिलीयन च्या घरात असून त्यात जपानचा वाटा 1.08 ट्रिलीयन( 14.88 टक्के) तर चीनचा 0. 870 ट्रिलीयन (11.96 टक्के) वाटा आहे. फाईव्ह जी तंत्रज्ञानात चीनचा जागतिक वाटा ८७ टक्के असून सिक्स जी तंत्रज्ञानातही अमेरिका चीनच्या खूप मागे आहे.
भारत आणि चीन यांच्यातील विविध आकडेवारी लक्षात घेतली तर आपण अनेक बाबतीत खूपच मागे आहोत. आपला शेजारी विश्वासघातकी असला तरी दोन्ही देशातील होणारे आयात निर्यातीचे व्यवहार आणि व्यापार हा लक्षणीय आहे. आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत. राष्ट्रवाद आणि व्यापार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चीनची लष्कराची ताकद आपल्यापेक्षा मोठी आहे हे नाकारता येणार नाही.
अमेरिका आणि चीन यांच्यातील शीतयुद्ध अजिबात लपून राहिलेले नाही. किंबहुना गेल्या काही दशकांमध्ये ते जास्त गडद होताना दिसत आहे.गेल्या वर्षभरात अमेरिकेतील बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्रातील संकटे त्यांची पिछेहाट करत आहेत. अत्यंत धूर्त व महत्वाकांक्षी चीन याचाच नेमका लाभ घेत आहे. अमेरिकेसह विविध राष्ट्रांमध्ये निर्माण होणाऱ्या संकटाची कारण मीमांसा वेगळी असू शकते. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली व अन्य बँकांची दिवाळखोरी अमेरिकेच्या वित्तीय यंत्रणेचे मोठे अपयश आहे. अमेरिकेत करोनानंतरच्या काळात मंदीने अमेरिकेने ठाण मांडलेले आहे. त्यांच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणापायी वित्त यंत्रणेला अपयशी ठरली. अगदी डॉट कॉम चा फुगा फुटल्यापासून किंवा सब प्राईम लेंडिंगमधून निर्माण झालेली संकटे त्यांची अर्थव्यवस्था वाचवू शकली नाही. जागतिक पातळीवर मंदीचा फेरा आला त्यावेळी अमेरिकेची वित्तीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले.अमेरिका त्यांच्या बळकट व सशक्त वित्तीय यंत्रणेच्या फुशारक्या मारत असते. परंतु अनेक वेळेला मालमत्ता, येणी आणि देणी, जोखीम यांचा समतोल न साधल्याने वारंवार गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. त्यांच्या आर्थिक अपयशाचा तसेच डॉलर अजून सशक्त असल्याने महागाई, व्याजदर वाढ याचा प्रतिकूल परिणाम युरोपातील देशांवर झाला. भारत, पाकिस्तान सारख्या देशांनाही त्याचा फटका बसला.
आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अग्रगण्य होण्याची स्वप्ने पाहत असताना चीनच्या वेगवान आर्थिक प्रगतीकडे आपण दुर्लक्ष करू शकणार नाही. चीनमधील अनेक तज्ञांच्या मते अमेरिकेची अर्थव्यवस्था व नेतृत्व हे उतरंडीला लागलेले आहे. चीनमध्ये साम्यवाद, हुकुमशाही आहे. लोकशाहीचा तेथे लवलेश नाही. त्यांचे सध्याचे नेतृत्व हे या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून रशिया सारख्या अत्यंत धूर्त आणि महत्त्वकांक्षी राष्ट्राच्या मदतीने जागतिक पातळीवर ठसा उमटवत आहे. जगभरातील विविध खंडांचा एकूण भौगोलिक, सामरिक इतिहास लक्षात घेता गेल्या काही वर्षात रशियाने निर्माण करून ठेवलेले युद्धाचे संकट, त्यात चीन करत असलेली मदत आणी त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला विविध आघाड्यांवरील येणारे अपयश निश्चित चिंताजनक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून जी ट्वेंटीच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी देशांतर्गत पातळीवर त्यांना होत असणारा विरोध चिंताजनक आहे. देशातील वाढती लोकसंख्या, वाढती गरिबी, बेरोजगारी, महागाई, दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या, पर्यावरणाचे गंभीर प्रश्न, पाणीटंचाई सारख्या समस्या आणि धार्मिक पातळीवरील वाढता विद्वेष, असहिष्णुता आपल्याला मारक ठरत आहेत. दुर्दैवाने शेजारी असलेल्या चीनबरोबर आपले संबंध चांगले होऊ शकले नाहीत. स्पर्धा करत असताना आपण अनेक क्षेत्रात मागे असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. चीनच्या प्रगतीला कोणताही धर्म जात पंथ, पक्ष याचा अडसर नाही. आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी मारत आहोत यात शंका नाही परंतु चीन बरोबर आपण कितपत टिकाव धरू शकतो हे पहाणे महत्वाचे आहे .चीनचे लष्करी बळ अफाट आहे. आर्थिक मस्ती तेवढीच आहे. लोकशाही नसल्याने चीनच्या नेतृत्वाला जास्त लाभकारक परिस्थिती आहे. चीनचे सर्वेसर्वा जिनपिंग यांचे सल्लागार जागतिक नेतृत्वाला सहाय्यभूत ठरत आहेत. आपल्या नेतृत्वाने याची गंभीर दखल घ्यावी ही अपेक्षा.
प्रा. नंदकुमार काकिर्डे