ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

कोरोना पुन्हा डोकावतो आहे

महाराष्ट्रात आणि देशातही करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने सर्वच स्तरावर काळजी घेण्याची हीच वेळ आहे, असेच म्हणावे लागते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मास्कचा वापर सुरू करण्याचे आवाहन केले आहे, तर केंद्रीय पातळीवरील केंद्रीय आरोग्य विभागानेही लोकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या देशभरात दररोज साधारण दोन ते अडीच हजार रुग्णांची वाढ होत आहे आणि दररोज मृत्यू पावणार्‍या रुग्णांचे प्रमाणही वीस ते तीस असे आहे. महाराष्ट्रातही दररोज सुमारे तीनशे ते चारशे नवीन रुग्ण आढळत आहेत. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करोनाच्या जेवढ्या लाटा येऊन गेल्या तेव्हा ज्या ज्या राज्यांत महामारीचा प्रभाव सर्वात जास्त होता तीच राज्ये आता पुन्हा एकदा प्रभावाखाली येत आहेत, हे सत्यही नाकारून चालणार नाही. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळू लागले आहेत. करोना संपला म्हणून गेल्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये समाजातील सर्वच घटकांनी जे मूलभूत नियम गुंडाळून ठेवले होते त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. खरे तर गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये आपण करोनाच्या तीन मोठ्या लाटांचा __ अनुभव घेतला आहे. पहिली लाट जेव्हा आली तेव्हा सर्वच नवीन असल्यामुळे काय करायचे, याबाबत सर्वत्र गोंधळ होता. कोणत्याही प्रकारचा लसीकरणाचा विषय समोर आला नव्हता. महामारीला थोपवण्यासाठी काय करायचे, याबाबत कोणाकडे काहीच नियोजन नव्हते. त्या कालावधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती; पण एकदा या महामारीचे स्वरूप लक्षात आल्यानंतर जेव्हा लसीकरणाची मोहीम सुरू झाली तेव्हा तीव्रता कमी झाली होती. नंतरही काही कालावधीनंतर दुसरी लाट देशात आली, जी सर्वात तीव्र लाट होती. दुसर्‍या लाटेनेच संपूर्ण अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था विस्कळीत करून टाकली होती. या कालावधीत दीर्घकाल सर्व सामाजिक आणि आर्थिक व्यवहार बंद होते. याचा फटका अजूनही सर्व समाजातील घटकांना बसत आहे. त्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यानंतर तिसरी लाट तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा तीव्रतेने आली नाही आणि याच कालावधीमध्ये लोकांमध्ये जागृती झाली होती. सर्वसामान्य नियमांचे पालन केले जात होते. लसीकरणाची मोहीमही मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली होती. त्यामुळे त्या लाटेवर लवकर नियंत्रण मिळवणे शक्य झाले होते. त्यानंतर गेल्या तीन-चार महिन्यांच्या कालावधीमध्ये जणूकाही महामारी संपली या विचाराने सर्वच व्यवहार नेहमीसारखेच सुरू झाले. जागतिक आरोग्य संघटनेने पुरस्कृत केलेल्या मूलभूत नियमांचे पालन करणे समाजातील विविध घटक विसरू लागल्यानेच आता पुन्हा एकदा नव्या लाटेची भीती समोर आली आहे. मूलभूत नियमांचे जर पालन करूनच आजपर्यंतच्या लाटांवर आपण नियंत्रण मिळवले असेल, तर पुन्हा एकदा त्या मूलभूत नियमांचा विसर पडून चालणार नाही, याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन केले असावे. ही परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रणात यावी यासाठी जेवढी सरकारची जबाबदारी आहे तेवढीच सर्वसामान्य नागरिकांचीही आहे. करोना हा संसर्गजन्य असल्याने जेवढा संसर्ग कमी होईल तेवढं त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते, असाच आजवरचा अनुभव सांगतो. जेव्हा जेव्हा करोनाच्या लाटा आल्या त्यापूर्वी काही दिवस आधी विविध कारणाने गर्दीच्या अनेक घटना घडल्या होत्या, हेसुद्धा सिद्ध झाले आहे. साहजिकच गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये करोना महामारीचे सर्व निबंध शिथिल झाल्यानंतर ज्या उत्साहाने लोक रस्त्यावर आणि विविध ठिकाणी गर्दी करत आहेत ती गर्दीच आणखी एक लाट आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. शहरातील किंवा खेड्यातील बाजारपेठा असोत किंवा सध्या विवाहाचा मोसम असल्याने अनेक ठिकाणी होणारे विवाह समारंभ असोत किंवा राजकीय पक्षांच्या सभा असोत, जेथे जेथे गर्दी जमते तेथे कोठेही मूलभूत नियमांचे पालन केले जाते, असे दिसत नाही. सरुवातीला सरकारी पातळीवर जेव्हा अतिशय कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली होती तेव्हा एक प्रकारची अस्वस्थता आणि विरोधाची भावना होती. पण त्या कडक निर्बंधांमुळेच महामारीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते. पुन्हा या महामारीला जर प्रभावशाली होऊ द्यायचे नसेल तर पुन्हा एकदा त्या मूलभूत नियमांकडे वळावे लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवण्याच्या मूलभूत नियमाचा पाठपुरावा करणे आणि सॅनिटायझर सारख्या जंतुनाशकाचा वापर करणे हे तीन नियमच आगामी कालावधीमध्ये महामारी तीव्र होण्यापासून समाजाला वाचवू शकेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणाच्या मोहिमेमध्ये पहिले दोन डोस घेण्यासाठी जेवढा उत्साह देशातील जनतेने दाखवला होता तेवढा उत्साह बूस्टर डोस घेण्यासाठी दाखवण्यात आलेला नाही. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कोणालाही लसीकरणासाठी सक्ती करता येणार नसली, तरी लसीकरणाचे कवच महामारीपासून दूर ठेवू शकते, हे वास्तवही नाकारून चालणार नाही. देशातील अनेक लोकांनी अद्याप पहिला किंवा दुसरा डोसही घेतलेला नाही त्यांनी ते लसीकरण पूर्ण करावे यासाठी आणि ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत त्यांनी बूस्टर डोस घ्यावा यासाठी सरकारने प्रबोधनाची मोहीम प्राधान्याने राबवण्याची गरज आहे. पावसाळी हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. या हंगामामध्ये जर पुन्हा एकदा करोनाची आणखी एक लाट आली तर संपूर्ण नियोजनच विस्कळीत होणार आहे. पावसाळी दिवसांमध्ये यंत्रणा बर्‍यापैकी विस्कळीत झालेल्या असतात. त्यातच महामारीचा दबाव आला तर हा दबाव अधिकच वाढण्याचा धोका लक्षात घ्यायला हवा. करोना महामारी पुन्हा एकदा डोके वर काढू पाहत असतानाच दुसरीकडे मंकी पॉक्स नावाच्या एका आजाराचाही धोका निर्माण झाला आहे. या आजाराचे रूग्ण अद्याप भारतामध्ये सापडले नसले, तरी जगातील 20 ते 21 देशांमध्ये हे रुग्ण सापडू लागले आहेत. त्या देशांशी भारताचाही आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि प्रवासी व्यवहार असल्यामुळे या रोगाचा शिरकावही कधी भारतात होईल याबाबत काहीही सांगता येत नाही जरी हा आजार करोनाप्रमाणे तीव्र संसर्गजन्य नसला तरी त्यामुळे यंत्रणांवर आणखीन एक दबाव येण्याचा धोका आहे ही सर्व परिस्थिती लक्षात घेताच आता काळजी घेण्याची वेळ आली आहे, हे समाजातील सर्वच घटकांनी लक्षात घ्यायला हवे.

error: Content is protected !!