आरसीएफ जवानांचा जयपूर -मुंबई एक्स्प्रेस मध्ये गोळीबार- रेल्वे पोलीस अधिकार्यांसह ४ ठार
पालघर – जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) जवानाने गोळीबार केला. त्यात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. वापी स्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर पहाटे या जवानाने तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि आरोपीने मिरा रोड स्थानकावर गाडी थांबल्यावर उडी मारली. तेथील रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेनंतर आरोपी जवानाची एक चित्रफीत वायरल झाली त्याबाबतही रेल्वे पोलीस तपास करत आहेत.
या जवानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात जवान “अगर वोट देना है, हिंदुस्थान मे रहना है तो मोदी और योगी, ये दो, और आपके ठाकरे” असं म्हणताना दिसतो आहे. या व्हायरल क्लिपच्या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. तपासाअंती यातलं सत्य बाहेर येणार आहे.
या हल्ल्यात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना, अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसैन भानपूरवाला, अख्तर अब्बास अली यांच्यासह एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी जवान चेतन सिंह याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जयपूर-मुंबई एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत चेतन सिंहने टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. त्या डब्यात आणखी एका प्रवाशाची हत्या केल्यानंतर त्याने पॅन्ट्री डब्यात एकाचा गोळी मारली. त्यानंतर पुढील डब्यामध्ये आरोपीने एकाची हत्या केली. त्यानंतर मिरा रोड स्थानकावर उतरल्यानंतर आरोपी स्थानकावर उतरून रूळांवरून पळू लागला. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान या घटनेनंतर आरोपीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात आरोपी धार्मिक विधाने करत असताना दिसून येत आहे. त्याबाबत पत्रकार परिषदेत रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांना प्रश्न विचारले असता तपास प्राथमिक स्तरावरून असून आम्ही सर्व बाजूंनी याप्रकरणी तपास करत असल्याचे सांगितले