कोल्हापूरच्या स्वप्नीलचा पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये झेंडा ! नेमबाजीत कांस्य पदक पटकावले
पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण ४५१. ४ गुण प्राप्त केले. चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण ४६३. ६. होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं.
भारत देशाचा झेंडा फडकला, त्याचा मला अभिमान आहे, असं स्वप्नील कुसाळेच्या आईने सांगितले. तसेच स्वप्नीलचे वडील म्हणाले की, माझा विश्वास होता, की तो पदक जिंकणारचं…आज मला खूप अभिमान आहे. आपल्या देशाने त्याने बहुमान मिळवून दिला, असं स्वप्नीलचे वडील म्हणाले. स्वप्नीलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्या प्रती असलेली श्रद्धा खूप आहे. तो त्यांना आईसमान मानतो..तो खूप भावनिक आहे..जी मुलं भावनिक असतात ती कधीच कुठे कमी पडत नाही, असं स्वप्नीलचे वडील म्हणाले. यावेळी माध्यमांशी बोलताना स्वप्नीलचे कुटिंबिय भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, कुस्तीपटू खाशाबा जाधव हे भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्रातील पहिले खेळाडू ठरले होते. त्यांनी १९५२ साली ही कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर ७२ वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना भारतासाठी पदक मिळवून देण्यात अपयश आलं होतं.