गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता बोगद्याच खर्च २५० कोटींनी वाढणार
.
मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार असून या बोगद्याचा खर्च २५० कोटी रुपयांनी वाढणार आहे. हळबेपाडा येथे टीबीएम यंत्रासाठी खड्डा खणण्यासाठी जमीन देण्यास आदिवासींनी विरोध केला असून आता टीबीएम यंत्रासाठी ६०० मीटर दूरवर खड्डा खोदावा लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा आधीच दुप्पट वाढलेला खर्च २५० कोटी रुपयांनी वाढणार आहे.
जुलै महिन्यात या बोगद्याच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे सांताक्रूझ – चेंबूर, अंधेरी – घाटकोपर, जोगेश्वरी – विक्रोळी हे तीन जोडरस्ते आहेत. मात्र दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ यामुळे या रस्त्यांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने चौथा पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी महानगरपालिकेने गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यामुळे गोरेगाव – मुलुंड अंतर अत्यंत कमी वेळेत गाठणे शक्य होणार आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकल्पाची मांडणी चार टप्प्यांत करण्यात आली आहे. त्यापैकी तिसऱ्या टप्प्यांतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमधील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. या बोगद्याच्या बांधकामाचे कंत्राट जे कुमार – एनसीसी यांना देण्यात आले आहे. प्रत्येकी तीन मार्गिका असणारा हा जुळा बोगदा साकारण्यासाठी एकूण ६० महिन्यांचा म्हणजेच ५ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.