ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणा-यांना माफी नाही: खा. शाहू महाराज

मुंबई,-भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, CWC सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार म्हणाले की, मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षापासून आहे, राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे, ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन होते.

शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपतींता पुतळा कोसळल्याने देशभरातील पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
खा. छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने जनता संतप्त झाली आहे. हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, ज्यांनी हे केले त्यांना माफी नाही. जे लोक याप्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे, त्याप्रमाणे आपली पावले पडली पाहिजेत असे शाहू महाराज म्हणाले.

error: Content is protected !!