कोरोनाचे संकट वाढतेय
गेले कित्येक दिवस जगभरातील आरोग्यविषयक तज्ज्ञ कोरोना महामारीच्या नव्या लाटेचा इशारा देत होते. त्यातच कोरोना व्हायरसच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटने आता युरोप आणि अमेरिकेमध्ये वेगाने पसरणे सुरू केले असून अनेक ठिकाणची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढविण्यात ओमायक्रॉन हा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ब्रिटन, फ्रान्स, इटली आदी देशांमध्ये कोरोनाच्या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. या वाढीव रुग्णांमध्ये मृतांची संख्या कमी आढळत असल्याने ती एक थोडा दिलासा देणारी बाब म्हटली पाहिजे. तसेच खरी चिंतेची बाब म्हणजे रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या बहुतांश रुग्णांचे लसीकरण झालेले आहे. तरीही त्यांना ‘ओमायक्रॉन’ने गाठले आहे. अमेरिकेमध्ये सात दिवसांत रुग्णांची सरासरी संख्या दोन लाखांच्या फारच पुढे गेली आहे. ‘ओमायक्रॉन’ला आधीच अमेरिकेतील सर्वात प्रभावी व धोकादायक व्हेरिएंट म्हणून घोषित केले आहे. वॉशिंग्टनमध्ये दररोज सरासरी 1,300 हून अधिक, तर न्यूयॉर्कमध्ये एकाच दिवसांत 49,000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतील केवळ 62 टक्के लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे आणि मोठ्या लोकसंख्येचे अद्याप लसीकरण न झाल्यामुळे किंवा केवळ अंशतः लसीकरण झाल्यामुळे आरोग्यतज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. ब्रिटनमध्ये नव्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ख्रिसमसच्या दिवशीही दहा लाखांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ख्रिसमसच्या सुट्टीमुळे गेल्या काही दिवसांपासून अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. पण त्यापूर्वी सलग चार दिवस ब्रिटनमध्ये दिवसाला दहा लाखांहून अधिक प्रकरणे आढळून आली होती. फ्रान्समध्येही दैनंदिन प्रकरणांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली. हा एक नवा विक्रम आहे. मात्र, ब्रिटनने नवीन वर्षासाठी कोणतेही नवीन निर्बंध लादणार नसल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्येही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. परदेशांमध्ये अशी चिंताजनक अवस्था असताना आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगणे गरजेचे होते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाबाबत सावधगिरी बाळगण्याची विनंती सर्व राज्य सरकारांना वेळोवेळी करत आहेत. त्यांना लागणारी सर्व मदत व मार्गदर्शन केंद्र सरकारतर्फे केले जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘यलो अॅलर्ट’ घोषित केला. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, व्यायामशाळा लवकरच बंद होणार आहेत. मेट्रो ट्रेन आणि बस 50 टक्के क्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 10 ते पहाटे 5 या कालावधीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि मेळाव्यांना पूर्णपणे बंदी घातली आहे. एकीकडे देशापुढे ओमायक्रॉनचे संकट उभे ठाकल्याने केंद्र सरकारने राज्यांना योग्य ती पूर्व काळजी घेण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे मात्र पाच राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुका हा चिंतेचा विषय ठरत आहेत. ओमायक्रॉनमुळे राज्यांकडून निर्बंध आणले जात असताना दुसरीकडे राजकीय पक्षांना मात्र कोरोनाचा जणू पूर्ण विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. हे पक्ष सभांसाठी लोकांची गर्दी जमवताना दिसत आहेत. त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टानेही ओमायक्रॉनची दखल घेत निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही राज्यात निवडणुकीसंबंधी प्रचारसभांवर बंदी घालण्याची आणि ओमायक्रानचे रुग्ण वाढत असल्याने निवडणूक काही काळासाठी पुढे ढकलण्यासंबंधी विचार करण्याची विनंती केली आहे. जर सभांवर बंदी आणली नाही, तर दुसर्या लाटेपेक्षाही वाईट परिणाम दिसू शकतात, असा इशारा न्यायमूर्ती शेखर यादव यांनी दिला असून आयुष्य असेल तरच जग आहे, असेही म्हटले आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाने केंद्राला निवडणुका असणार्या राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याचा आदेश दिला आहे. या राज्यांमध्ये सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय गाठावे, असे म्हटले आहे. 2022च्या पहिल्या तिमाहीत गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या पाचही राज्यांमधील निवडणुकांवर ओमायक्रॉनमुळे संकट निर्माण झाले असून त्याबाबत अनिश्चितता आहे. इतके सर्व सुरू असताना महाराष्ट्र आणि राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील ही 216 दिवसांनंतरची सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. मुंबईत गेल्या सात दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे यापुढेही कोरोना निर्बंधांकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास संख्यात्मक वाढीच्या रूपाने त्यांची किंमत मोजावी लागण्याचे चित्र सध्या दिसत आहे. राज्यात 20 डिसेंबरला सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 5000 ते 6000 इतके होते. मंगळवारी संध्याकाळपर्यंत हा आकडा 11492 इतका झाला होता, तर बुधवार संध्याकाळपर्यंत हा आकडा 20 हजारांच्या पलीकडे जाऊ शकतो. मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 2100 वर पोहोचण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती एकाच दिवसात रुग्ण दुप्पट होण्यासारखी आहे. त्यामुळेच सर्व काही सुरळीत होत असतानाच हा धोका पुन्हा निर्माण झाला असून त्याला सरकारी यंत्रणांबरोबरच आपण सारे सुजाण नागरिकही तितकेच जबाबदार आहेत, हे निश्चत.