मी ६ तारखेला बारसूला जाणारच
उद्धव ठाकरेंनी राणेंचे आव्हान स्वीकारले
मुंबई – मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या ठिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी आज विचारला. बारसूतल्या लोकांना मी भेटणार आणि त्यांच्याशी बोलणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आव्हान स्वीकारलं. मुंबईतल्या बीकेसीतली जागा ही बुलेट ट्रेनच्या घशात घातली असं ते म्हणाले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, मग तो कोणीही असो असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
बरसू रिफायनरी प्रकल्पावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे कोकणात आले तर त्यांना कोकणातून पळवून लावू असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी बारसूतल्या लोकांना भेटणार आणि बोलणार. मला अडवणारे तुम्ही कोण? मी 6 मेला बारसूला जाणार आहे. मी ती जागा सूचवली होती, पण त्याठिकाणी पोलिसांना पाठवा, लाठीमार करा असं लिहिलं होतं का? सर्वमान्यता मिळाली तरच बारसूत रिफायनरी होणार.
इंग्रजांपेक्षा भयंकर लूट ही भाजप सरकार करत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रातून उद्योग बाहेर नेले जात आहेत. बुलेट ट्रेनने कोण प्रवास करणार आहे? मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येत नाही म्हटल्यावर मुंबईला मारलं जात आहे. मुंबईतून अनेक प्रकल्प हे गुजरातला नेले. या आधी बाळासाहेबांनीही इशारा दिला होता, आता मीही सांगतो, कुणीही असो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर तुमचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. असेही ते म्हणाले
भाषा आम्ही सक्तीची केली पण मिंधे सरकार आलं आणि यांनी ती ऐच्छिक केली, बाळासाहेबांचे विचार असल्याचं सांगणाऱ्या मिंध्यांना काहीच वाटत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शरद पवारांच्या सल्ल्याने काम करतोय असं म्हणणारे मिंधे, त्यांचे मंत्री आज शरद पवारांना भेटले. मग तुम्ही भेटलात तर चालतं? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. ..
उद्धव ठाकरे म्हणाले की, कर्नाटकमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की त्यांना काँग्रेसने 91 वेळा शिव्या दिल्या. पण तुमचे लोक मला, आदित्य ठाकरेंना, माझ्या कुटुंबीयांना कोणत्या भाषेत शिव्या देतात त्याकडे लक्ष द्या. आतापर्यंत मी गप्प बसलो होतो. पण यापुढे शिव्या द्याल तर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. हीच शिकवण तुमच्या रामभाऊ म्हाळगी संस्थेत शिकवला का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे अपत्य मान्य आहे का?