कोकणात २ दिवसात पावसाचा येलो अलर्ट
मुंबई : राज्यासह देशात सध्या वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून मान्सून आता कर्नाटककडे कार्गक्रमण करताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात कुठे ऊन तर कुठे पावसाचा खेळ सुरु आहे. कोकणासह मराठवाड्यात बऱ्याचशा भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील 48 तासांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. तर काही भागात पावसाची शक्यता आहे.
1 जूनपासून संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात तापमान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. कोकणात आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात आज आणि उद्या मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी 40 ते 50 किमी ताशी वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसात काही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या भागातही पावसाचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे या या भागात कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्येही पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
सध्या उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. मात्र, नागरिकांना किंचित दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दिल्लीसह गाझियाबाद, नोएडा आणि फरीदाबादमध्ये काही तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल, आसाम, मेघालय, सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. आयएमडीने या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय अंदमान निकोबार आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
