कुडसावरेच्या डोंगरावर वृक्षारोपण.
गार्गी सोशल अकॅडमीने केले २०० वृक्षांचे रोपण
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूर जवळील कुडसावरे परिसरात वनविभाग व गार्गी सोशल ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण मोहिमेत २००हुन अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.गार्गी सोशल ॲकेडमीतील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबाबत आवड निर्माण व्हावी तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने ॲकेडमीच्या गार्गी चव्हाण यांच्या पुढाकाराने बदलापूर जवळील कुडसावरे येथे या वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेतील विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालकही या उपक्रमात सहभागी झाले होते.वांगणी येथील वन विभागाचे अधिकारी श्रीकांत राऊत, ढवळे येथील वनरक्षक उदय मोरे, गोरेगावचे वनरक्षक अनंत पवार, चामटोलीचे वनरक्षक प्रेम राठोड, चिंचवलीचे वनरक्षक विनोद लोढवाल, कुडसावरे ग्रामपंचायत सदस्य आशालता टेंभे, उल्हास मसने, नरेश मोरगे, ग्रामस्थ दीपक मसने, प्रकाश टेंभे आदी यावेळी उपस्थित होते. ॲकेडमीचे विद्यार्थी व पालकांनीही नियमितपणे अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यानुसार आगामी काळातही असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ॲकेडमीचे प्रमुख संतोष चव्हाण यांनी सांगितले.