महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनताच जोडे मारणार – मुख्यमंत्री
मुंबई – कर्नाटकात काँग्रेस सरकारने बुलडोझर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडण्यात आला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने किंवा चपलेने मारलं पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता समजदार आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोड्याने मारणार असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणालेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले. आधी मुंबई उच्च न्यायालयात गेले, आता नागपूर खंडपीठात गेले. गरीब भगिनींना आम्ही पैसे देत आहोत तर यांच्या पोटात का दुखतं? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच यावरुन यांची मानसिकता समजत असल्याचेही शिंदे म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलं आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले. तसंच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले सहभागी झाले आहेत. हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन हा मोर्चा काढण्यात आला. मात्र हा मोर्चा शिवरायांच्या प्रेमासाठी नाही तर राजकीय हेतूने प्रेरित आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीला उत्तर दिलं आहे.
मुंबई त महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन करत सरकारविरोधात मोर्चा काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला. त्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला जनता जोडे मारणार आहे. असं म्हणत उत्तर दिलं आहे. निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे हे आंदोलन केलं जातं असल्याचेही मुख्यमंत्री म्हणालेत.