ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजन

देवेन सुभाष पवार : मराठमोळ्या युवा कलादिग्दर्शकाची गगन भरारी !

साधारण वीस वर्षापूर्वीची घटना. सुभाष पवार हे सद्गृहस्थ बोरीवली येथील जय महाराष्ट्र नगरात ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या घरी आले. त्यांना आपला मुलगा कलाक्षेत्रात वाकबगार असल्याचे सांगून त्याला योग्य दिशा देण्याची विनंती केली. विजय वैद्य यांनी त्यांना मुलाला घेऊन या असे सांगितले. त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन आले. प्रभाकर बाणे या आपल्या मित्राकडे विजय वैद्य त्या दोघांना घेऊन गेले. प्रभाकर बाणे यांनी साक्षात विजय वैद्यच आल्याचे पाहून मनावर घेतले आणि प्रख्यात कला दिग्दर्शक रत्नाकर फडके यांच्याकडे नेले. मराठमोळे रत्नाकर फडके नावाजलेले कलादिग्दर्शक होते. त्यांनी या मुलाला वरपासून खालपर्यंत आपल्या चाणाक्ष आणि कलासक्त नजरेने न्याहाळले. कोणताही मोठा कलाकार पटकन कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही. तो जर खरोखरीच हिरा असेल तर त्याला पारखून घेण्यात येतो. हिऱ्याला सुद्धा पैलू पाडून घेण्यासाठी प्रचंड अग्नीपरीक्षा द्यावी लागते. त्याप्रमाणे या विशीतल्या मुलाने आपल्या अग्नीपरीक्षा देण्यास प्रारंभ केला. सुरुवातीला फक्त आणि फक्त ब्रश घेऊन रंगाऱ्याचे काम या मुलाने केले. अर्जुनाने जसे द्रोणाचाऱ्यांचे मन जिंकले त्याचप्रमाणे या मुलानेही रत्नाकर फडके यांचा संपूर्ण विश्वास संपादन केला. इतका की रत्नाकर फडके जेंव्हा आजारी पडले तेंव्हा त्यांच्या तोंडी फक्त देवेन देवेन हेच नांव होते. गुरुला काहीही होता कामा नये, याची दक्षता घेऊन देवेन ने रत्नाकर फडके यांच्या कडे जीवापलिकडे लक्ष पुरविले. रत्नाकर फडके यांचे सहाय्यक, सवंगडी सर्वांना देवेन हवाहवासा वाटू लागला आणि देवेन सुभाष पवार या युवा कला दिग्दर्शकाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. १० ऑगस्ट १९७९ रोजी सुभाष आणि सौ. स्वाती सुभाष पवार या सामान्य मराठी माणसाच्या कुटुंबात जन्मलेल्या देवेन ने आपले माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षे पर्यंत चे शिक्षण १९९६ साली पूर्ण केले. त्यानंतर कमर्शियल आणि फाईन आर्ट ची पदवी मुंबई येथील एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट आणि करिअर कॉलेज, मुंबई येथून पदविका प्राप्त केली. हनुमंत जसा जन्मतःच सूर्याच्या दिशेने झेपावला होता, त्याचप्रमाणे देवेनने सुद्धा कलाविश्वात गरुडझेप घेण्याचा निश्चय केला होता. त्यांच्या या निश्चयाला रत्नाकर फडके यांचा पूर्ण आशीर्वाद मिळत गेला. आधी ब्रशचे फटकारे मारणारा देवेन सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम करु लागला. आणि मग स्वतः च कला दिग्दर्शक म्हणून काम हाती घेतले. आज केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ज्या पहिल्या पाचात वाखाणल्या जातात त्या स्मृती झुबीन इराणी यांनी आपल्या कलेची सुरुवात ज्या उंबरगावच्या सेट वरुन केली त्याच उंबरगाव मध्ये देवेन सुभाष पवार या नवोदित, नवोदित कसला ? अहो हा देवेन कलाक्षेत्रात कसलेला कला दिग्दर्शक म्हणून नावारुपाला आला आहे. उंबरगावच्या विस्तीर्ण जमिनीवर देवेन सुभाष पवार या तरुण कला दिग्दर्शकाने चित्रीकरणासाठी जे सेट उभारले आहेत ते अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. अहो, किती म्हणून सांगायची नांवे ? चित्रपट म्हणू नका, मालिका म्हणू नका. अक्षरशः चित्रीकरणासाठी सेट्स ची मांदियाळी म्हणावी लागेल. बरं, रत्नाकर फडके यांच्या पासून सर्वच सहकाऱ्यांची या देवेनभाऊंनी तळहाताच्या फोडाला जपावी तशी जपणूक केली आहे. उच्च नीच, जात पात, पंथ भेद या गोष्टीना देवेनभाऊंच्या या प्रांतात अजिबात थारा नाही. लहानाबरोबर लहान, मोठ्यांबरोबर मोठा अशा पद्धतीने देवेनभाऊंनी स्वतःचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. आपल्या सेटवर काम करणाऱ्या सामान्य कामगाराला सुद्धा देवेन तितकेच महत्त्वाचे मानतात जितके त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी. त्यामुळे सर्वांमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत चांगली आहे. रत्नाकर फडके, चंद्रवर्धन मोरे, तरुण आहुजा अशा अनेक दिग्गज कला दिग्दर्शक मंडळींबरोबर काम करतांना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची हैसियत निर्माण केली आहे. परंतु डोक्यात हवा जाऊ न देता ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत दिग्दर्शनाचे आकाश निर्माण केले.

l

अवघ्या वीस वर्षांत गगनभरारी घेत असे अभूतपूर्व सेट उभारले की एका ख्यातनाम कलाकाराने तर प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना, “अरे, नितीनभाय, वो उंबरगाममें देखो ये नये लडकेने क्या जबरदस्त सेट खडा किया हैं, आँखे चकाचौंध हो जायेगी”, असे सांगितले. खरे म्हणजे हीच खरी देवेन सुभाष पवार यांच्या कलेला एक महत्वपूर्ण अशी दाद होती, हे एक सर्टिफिकेट होते, प्रमाणपत्र होते. पण अशी सर्वोत्तम दाद मिळूनही देवेन सुभाष पवार कधी हुरळून गेले नाहीत, अथवा त्यांच्या डोक्यात यशाची नशा चढली नाही. आई शिक्षिका, वडिल अत्यंत प्रामाणिक, पत्नी सुस्वभावी, मुलगी हुशार त्यामुळे देवेन सुभाष पवार सुद्धा ‘चकाचौंध’ अशा सिताऱ्यांच्या, ताऱ्यांच्या दुनियेत असूनही पाय जमिनीवर आहेत. आपल्या शाईन आर्ट प्रोडक्शन हाऊस च्या बँनरखाली नावाजलेल्या मालिकांचे सेट बनविले आहेत. महाभारत, सूर्यपूत्र कर्ण, आब्रा का डाब्रा, चेहरा, ताज महाल, मेरे अपने, एल ओ सी, कजरारे, रझिया सुलतान अशा असंख्य मालिकांचे सेट उभारतांना देवेन सुभाष पवार यांनी जे कलाकौशल्य दाखविले आहे आणि जी जिद्द, मेहनत, परीश्रम केले आहे त्याला वाखाणण्यासाठी शब्द भांडार सुद्धा अपुरे पडावे, एवढे प्रचंड कार्य या मराठमोळ्या कला दिग्दर्शकाने केले आहे. नुकतीच ‘एक जय कन्हैयालालकी’ ही मालिका सुरु असून त्याच्या चित्रीकरण आणि सेट उभारणी करण्यात ते स्वतःला झोकून देऊन काम करीत आहेत. या वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी देवेन सुभाष पवार यांनी कला दिग्दर्शनात जी गरुडझेप घेतली आहे, गगनभरारी घेतली आहे, ते पाहता या कला दिग्दर्शकाच्या हातून आणखीही अनेकविध सेट उभे रहावेत, यासाठी त्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त व्हावे, बॉलिवूडमध्ये अत्युच्च शिखरावर देवेन सुभाष पवार यांचे अढळपद निर्माण होऊन आद्यचित्रपट महर्षि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा, ही नटराजा चरणी विनम्र प्रार्थना-योगेश वसंत त्रिवेदी

error: Content is protected !!