ज्येष्ठ पत्रकार सतीश खांबेटे यांचे निधन
मुंबई, गुरुवार : ज्येष्ठ पत्रकार, लेखक व रशियन भाषेचे तज्ज्ञ सतीश खांबेटे यांचे बुधवार, दि. 1 डिसेंबर, 2021 रोजी सायं. 4.00 च्या सुमारास दहिसर येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. गेले काही महिने ते पोटाच्या विकाराने आजारी होते.
सतीश खांबेटे यांनी दै. नवशक्ती, सकाळ, तरुण भारत आणि शिवनेर अशा विविध वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली. बहुभाषिक वृत्तसंस्था, हिंदुस्थान समाचार, नियतकालिक सोविएत देश येथे देखील त्यांनी काम केले. रशियन वकिलातीच्या प्रसिद्धी विभागात देखील काही वर्षे ते कार्यरत होते. त्यांनी अनेकदा रशियाचा दौरा केला होता. ते रशियन भाषा शिकवित असत. त्यांची कन्या नियती ही रुईया महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. त्यांनी मॉस्को गाथा',
इंद्रधनू’, `वृत्तकार’ अशी पुस्तके लिहिली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित कन्या, जावई, दोन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. कै.खांबेटे यांचे वडील कै. गणेश मोरेश्वर ऊर्फ आबासाहेब खांबेटे हे लघुवाद न्यायालयात न्यायाधीश होते.
मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ अशा विविध पत्रकार संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या या आपल्या जिवलग मित्राच्या निधनाने पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त श्री.अजय वैद्य यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारत-रशिया संबंध आणि रशियामधील घडामोडी यासंबधी खांबेटे यांच्याकडे विपूल माहिती उपलब्ध होती. तसेच या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण लिखाण केले होते, असेही श्री. अजय वैद्य यांनी म्हटले आहे.
कै. सतीश खांबेटे हे अजातशत्रू पत्रकार होते. मराठी, इंग्रजी, हिंदी व रशियन भाषेवर त्यांचे प्रभूत्व होते. ते उत्तम अनुवादक आणि लेखक होते. त्यांच्या निधनाने आपण एक सच्चा मित्र गमावला असून अभ्यासू पत्रकार आपल्यातून गेला आहे, अशा शब्दात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी कै. खांबेटे यांना श्रद्धांजली वाहिली.