शिंदे – फडणवीस दिल्लीला रवाना- महायुतीत अजित पवारांची नाराजी
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. हे दोन्ही नेते अचानक दिल्लीला गेले असल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे आणि फडणवीस आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
असं असलं तरी अजित पवारांची नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव हे या दिल्ली दौऱ्यामागचं कारण आहे का असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. परंतु राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. आजच्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नव्हते. राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. त्याचमुळे आता हे दोन्ही नेते दिल्लीला गेलेत की काय अशी चर्चा आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणे गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या एका कार्यक्रमात होते, पण वेळेआधीच त्यांनी समारोपाचे भाषण केले आणि तातडीने ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे.
राज्याच्या राजकारणार भाजप हा मोठा भाऊ असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मोठा भाऊ या नात्याने भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी काही त्याग करायला तयार असलं पाहिजे असंही ते म्हणाले होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच की काय त्यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली नसल्याचं सांगण्यात येतंय. अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी त्यांच्या गटाचे नेते एकत्र येत असल्याची माहिती आहे.