पवारांचा राजीनामा- महाविकास आघाडीची धोक्याची घंटी
मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या राजीनाम्यावर फेरविचार करण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ मागितला आहे . पण पवार राजीनामा मागे घेणार नाहीत तर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी जी समिती नेमली आहे ती ५ तारखेला निर्णय घेणार आहे. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष बनवून अजितदादांसाठीं महाराष्ट्रात रान मोकळे करून दिले जाणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा एक भाग आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी व्यतिरिक्त काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत जागावाटप कसे होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जून 2022 मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळत आहेत. तेव्हापासूनच 2019 मध्ये जसा पहाटेचा शपथविधी झाला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतं, अशा चर्चांना उधाण आलं होतं, मात्र शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि भाजपनं एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे पायउतार होणार आणि त्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हापासूनच राज्यात लवकरच राष्ट्रवादी, भाजपचं सरकार येणार असल्याच्या चर्चा सरू आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या शरद पवारांच्या घोषणेनं पक्षाच्या ताकदीला एक आधार मिळाला आहे. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात कारस्थान करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळालं असून, पुढचं पाऊल उचलण्यापूर्वी ते अनेक वेळा विचार करतील, असं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे.