पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर – बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास १० दिवसात आरोपीला फाशी
कोलकत्ता – आर्जीकर रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर कोलकत्यात जो हंसेचा आगडोंब उसळला आहे तो शमलेला नाही . अखेर आज पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात अपराजिता वुमन्स अँड चाईल्ड बिल मंजूर केले यात बलात्कार झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्यास १० दिवसांच्या आत आरो पीला फाशी देण्याची तरतूद असेल
पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसंच लैंगिक अत्याचार, शोषण आणि बलात्काराच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नवं विधेयक आणलं आहे. या विधेयकातली महत्त्वाची तरतूद म्हणजे बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीला फाशी दिली जाणार ही आहे. बलात्कार आणि शोषणाच्या घटनांच्या विरोधात हे विधेयक आणण्यात आलं होतं हे विधेयक ममता सरकारने मंजूर केलं आहे. विधानसभेत हे विधेयक मांडण्यात आलं जे सगळ्याच आमदारांनी एकमुखाने मान्य केलं.
अपराजिता वुमन चाईल्ड बिल असं या विधेयकाचं ( पश्चिम बंगाल गुन्हेगारी प्रतिबंध कायदा दुरुस्ती विधेयक २०२४ ) नाव आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. मागच्या महिन्यात ९ तारखेला आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. या प्रकरणानंतर आता कायदे कठोर करण्याच्या दृष्टीने ममता सरकारने हे नवं विधेयकआणलं ज्या विधेयकाला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. ही शिक्षा त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या होत नाही तोपर्यंत असेल. त्याचप्रमाणे बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपींना फाशी दिली जाईल. बलात्कार प्रकरणाचा तपास अहवाल २१ दिवसांच्या आत आला पाहिजे अशीही तरतूद करण्यात आली आहे. जर २१ दिवसांत तपास पूर्ण झाला नाही तर तपास पूर्ण करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतच वाढवून मिळेल. या १५ दिवसांच्या कालावधीत जो तपास केला जाईल तो पोलीस अधीक्षक आणि त्यावरच्या पदावरचे अधिकारी यांच्या नेतृत्वातच केला जाईल. अशा तरतुदी या विधेयकात आहेत.