ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सत्यजित, राहुल, आणि सम्राट ही जोडी – शिराळ्याला नक्की वैभवाचे दिवस आणतील -भाजपा गटनेते दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

सम्राटच्या हातात शिराळ्याची कमान

असल्यानेच त्यांना विमान पाठवले

तुमच्यासारख्या हिऱ्याला पैलू पाडायचे

काम देवेंद्र फडणवीस करतील

सांगली- येथील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सम्राट महाडिक यांच्या महाडिक युवा शक्ती संघटनेमार्फत ‘विजयाचा निर्धार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होत.शिराळ्यात इतिहास घडवायचा आहे. राहुल, सम्राट आणि सत्यजित ही जोडी शिराळ्याला नक्की वैभवाचे दिवस आणतील, असा विश्वास यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.

यामेळाव्याला भाजपा महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख, भाजपचे तरुण तडफदार नेते सम्राट महाडिक, राहुल महाडिक, संपतराव देशमुख, फत्तेसिंह देशमुख, भाजपा जिल्हध्यक्ष हणमंतराव पाटील, विश्वप्रताप नाईक, स्वरूपराव पाटील, सचिन पाटील, जयकर कदम, मन्सूभाई वाटारकर, विद्या पाटील, जगन्नाथ महाडिक, अशोक पाटील, केदार नलावडे, प्रतापराव पाटील, चंद्रकांत पाटील यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्यात बोलताना दरेकर म्हणाले कि, आज ऐतिहासिक क्षण आहे. उमेदवारी मागणारा नेता उमेदवारी मागे घेतो. आपल्या पक्षासाठी, नेतृत्वासाठी, मी पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणेन अशा मोठया मनाचे सम्राट महाडिक या सभेतून आपल्याला दिसले. उमेदवारी मिळवणे, मागणे आणि ती नाकारल्यानंतर आपली, कार्यकर्त्यांची मानसिक अवस्था काय होते हे मी एकदा नव्हे तर चार वेळा भोगलेय. सर्व प्रक्रियेतून मी गेलोय. सम्राट महाडिक तुम्ही शिराळ्याच्या विकासासाठी जो काही त्याग केलात तो भाजपा आणि देवेंद्र फडणवीस व्याजासकट भरून देणार हा शब्द जाहीरपणे देण्यासाठी मी आलो असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच ही पवित्र भूमी शिराळ्याची आहे. ही सभा सम्राट महाडिक व महाडिक कुटुंबियांसाठी कार्यकर्त्यांनी आभार सभा म्हणून घेतलीय. मोठ्या मनाचा माणूस म्हणून शिराळ्याच्या इतिहासात सम्राट महाडिक आपली नोंद झाल्याशिवाय राहणारनाही, असा विश्वाही दरेकरांनी दिला.

दरेकर पुढे म्हणाले कि, महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. परंतु ठाकरे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र ठप्प झाला होता. अशा वेळी पाच वर्ष मुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांनी विडा उचलला राज्यात सत्ता बदल केला पाहिजे, अन्यथा राज्य अधोगतीला जाईल. त्यानंतर शिंदे, अजित पवारांना बरोबर घेऊन राज्यात महायुती सरकार स्थापन झाले. तिथे फडणवीसांनी विचार केला नाही मी मुख्यमंत्री होतो उपमुख्यमंत्री म्हणून काम कसे करणार. शिंदे, अजित पवारही मोठे नेते त्यांनीही विचार केला नाही. सत्ता ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे हा एकच विचार त्यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आले. तोच पायंडा आपण पाडतोय. शिराळ्याच्या विकासासाठी एकत्र आलात. ही शिराळ्याची जनता आयुष्यभर आपल्याला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर म्हणाले. तसेच ‘आज आहे प्रसंग बाका, शिराळ्याचा विजय करेल पेट नाका, पेट नाका, असे सांगत सम्राट महाडिक यांच्यासारख्या कार्यकर्त्याची महाराष्ट्राला गरज आहे. तुमच्यासारख्या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम देवेंद्र फडणवीस केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दही दरेकरांनी यावेळी उपस्थितांसमोर दिला.

दरेकर पुढे म्हणाले कि, आज माहोल बदलतोय. विरोधक प्रस्थापितांसारखे सुडाचे राजकारण करणार, बँकेच्या, कारखान्याच्या जीवावर दादागिरी करणार. मी गेली २५ वर्ष मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. मी कर्ज देताना पक्षपातीपणा करत नाही. बच्चू कडूसारख्या नेत्याला कारखान्यासाठी १४ कोटीचे कर्ज दिले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केलात तर येणाऱ्या काळात जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दरेकरांनी शरद पवार गटाचे उमेदवार मानसिंग नाईक यांना दिला. तसेच मुंबईत येऊन हातावर घड्याळ बांधायचे आणि इकडे येऊन तुतारी वाजवायची, असा अविश्वासू माणूस तुम्हाला विश्वास काय देणार, असा टोलाही दरेकरांनी नाईक यांना लागवला. त्याचबरोबर नानासाहेब महाडिक ज्या-ज्या बाजूला राहिले तो आमदार निवडून आलेला आहे. आज नानासाहेबांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांना निवडायला निघाले आहेत तेव्हा जगातली कुठलीही ताकद आपला आमदार करण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

दरेकर पुढे म्हणाले कि, मी विरोधी पक्षनेता असताना राज्याचा दौरा करत होतो. त्यावेळी सत्यजित यांचा मला फोन आला माझ्याकडे येऊन जा. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांचे छोटेसे घर पाहिले. जे शिवाजीराव देशमुख राज्याचे अनेक वर्ष मंत्री होते त्यांनी स्वतःसाठी, कुटुंबासाठी काही पुंजी जमा केली नाही हे घर पाहून दिसले. त्यांच्याकडे गोरगरीब माणसांची असलेली श्रीमंती सत्यजित तुमच्यामागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर म्हणाले. तसेच राज्यात सरकार तर महायुतीचेच येणार आहे. लाडक्या बहिणींनी चित्र पालटून टाकलंय. हरियाणाचा निकाल लागल्यावर खात्री पटली कि महाराष्ट्रात सत्ता आपली येणार. सत्ता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आली. २०-२५ वर्षात विकास झाला नाही तो दोन वर्षात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस, अजित पवारांचनी करून दाखवला. अनेक योजना आणल्या. त्यातील लाडकी बहीण योजना. या लाडक्या बहिणीच आपले सरकार आणणार आहेत, तुम्ही काळजी करू नका.

दरेकर पुढे म्हणाले कि, ठाकरेंचे सरकार असताना ६ सिंचनाच्या प्रकल्पना सुप्रमा दिलेली. देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री झाल्यावर ११६ सिंचन प्रकल्पना सुप्रमा दिली. राज्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचा विचार करणारे आमचे नेते आहेत. मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठी उभे आहे. केंद्रात राज्यासाठी अनेक प्रकल्प असतात त्याला केंद्र निधी देतो. ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प मंजूर करूनही राज्याचा हिस्सा दिला गेला नाही. ही कोत्या मनाची लोकं आपले भले करू शकतात का? सरकार आल्यावर शिंदे दिल्लीला गेले. अनेक प्रकल्प सुरु झाले. राज्याचा हिस्साही मिळाला. उद्धव ठाकरेंना दिल्लीला जायला कमीपणा वाटायचा. मविआत अजूनही झोंबझोंबी सुरु आहे. ते मनाने एक नाहीत तर राज्यासाठी कसे एक होऊ शकतात. आमची लढाई राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी असल्याचे दरेकर म्हणाले.

मराठा आरक्षणावर बोलताना दरेकर म्हणाले कि, मराठा आरक्षण आपण दिले होते. राणे समिती असताना आरक्षण दिले मात्र केवळ आयोग नेमला नव्हता म्हणून टिकले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले ते कोर्टात टिकले, सुप्रीम कोर्टानेही फेटाळले नाही. अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना दिल्या, सारथी मार्फत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठा समाजासाठी महायुती सरकार प्रामाणिकपणे काम करतेय. मुख्यमंत्री शिंदेंनी छत्रपतींच्या पायावर हात लावून सांगितले मी आरक्षण देणार. त्याप्रमाणे दिलेही आणि ते टिकविण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज आपल्या बाजूने चांगले वातावरण आहे. कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका. सरकार आपले आहे आणि येणारे सरकारही आपले आहे. २० नोव्हेंबरपर्यंत दिवसरात्र आपल्याला उमेदवार, कमळासाठी काम करायचे आहे. शिराळ्यात इतिहास घडवायचा आहे. राहुल, सम्राट आणि सत्यजित ही जोडी शिराळ्याच्या विकासाला दिशा देतेय. नक्कीच शिराळ्याला वैभवाचे दिवस येतील, असेही दरेकर म्हणाले.

चौकट

विजयाचा गुलाल उधळायची संधी द्या

दरेकर म्हणाले कि, सम्राट महाडिकांचा सन्मान होणार. विधिमंडळ म्हणा किंवा त्याहीवर जाऊन त्यांचा सन्मान झालेला निवडणुकीत दिसेल. त्यांचा सन्मान हा तुमचा सन्मान आहे. मघाशी कोणीतरी म्हटले कि सम्राटरावांना विमान पाठवले, बाकीचे म्हणाले आम्हाला का नाही पाठवले. विमान हे येड्यागबाळ्याला पाठवत नाही. सम्राट महाडिक यांच्या हातात शिराळ्याची कमान आहे म्हणून त्यांना विमान पाठवले. देवेंद्र फडणवीस यांनी जो विश्वास दिलाय त्याला तडा जायला देणार नाही. आम्हाला विजयाचा गुलाल उधळायची संधी द्या, फडणवीसांना सांगू शिराळ्याचा विजय साजरा करण्यासाठी तुम्ही स्वतः या. मी त्यांना घेऊन आपल्या दर्शनासाठी येईन, असे आश्वासनही दरेकरांनी दिले.

error: Content is protected !!