ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

मंदीची अमेरिकेत नांदी; भारताला सुवर्णसंधी!


करोना नंतरच्या दोन वर्षांमध्ये जागतिक पातळीवर सर्व देशांना भरपूर आर्थिक फटके बसले. २०२२ च्या प्रारंभी सुरु झालेल्या युक्रेन व रशिया युद्धापोटी संपूर्ण जग वेठीला धरले गेले. ‌मात्र या प्रतिकूल परिस्थितीत भारताची आर्थिक आघाडीवरील कामगिरी अन्य सर्व देशांच्या तुलनेत  उजवी आहे. त्यामुळे भारताला जी-२० देशांचे अध्यक्षपद मिळण्याची संधी लाभली आहे. जागतिक पातळीवर भारताकडे नेतृत्वासाठी पाहिले जात असताना देशांतर्गत आव्हानांचा बिमोड करण्याची गरज आहे. त्याचा हा मागोवा.

जागतिक पातळीवरील विविध देशांच्या आर्थिक प्रगतीवर नजर टाकली तर आपली सद्य स्थिती जगातील प्रमुख देशांच्या तुलनेत निश्चित उजवी किंवा समाधानकारक आहे.  विविध देशांचे सकल देशांतर्गत उत्पादन ( ज्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट – जीडीपी ) लक्षात घेतले तर भारत  चांगल्या स्थितीत आहे. अमेरिका, युरोप आणि चीन यांची कामगिरी पहाता भारत हा उगवत्या ताऱ्यासारखा  चमकत आहे. गेल्या २ वर्षात म्हणजे २०२१-२०२२ व २०२२-२०२३ या वर्षात आपण अनुक्रमे ६.८ टक्के व ६.१ टक्के जीडीपी (विकास )  गाठण्याच्या दिशेने जात आहोत. हा अंदाज खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा ( इंटरनॅशनल मॉनेटरी फंड- आय एम एफ ) यांचाच आहे. यात आपण केवळ अमेरिका, युरोपातील सर्व देश व आपल्या शेजारील  ‘ड्रॅगन’ चीन   यांचीही वाढ २०२१-२२  मध्ये ३.२  टक्के तर चालू आर्थिक वर्षात म्हणजे २०२२-२३ मध्ये ४.४ होण्याची अपेक्षा आहे. त्याच प्रमाणे या दशकाच्या अखेरीस भारत ही जगातील  तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. भारतीय शेअर बाजारही त्याच ताकदीचा निर्माण  होत आहे,. भारतीय अर्थव्यवस्थेचा कानोसा घेता गेल्या काही महिन्यात महागाई किवा भाववाढ, चलन वाढ नियंत्रणाखाली येताना दिसत आहे . रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेनुसार नसती तरी इंग्लंड, अमेरिका व युरोप यांच्या तुलनेत आपण सुस्थितीत आहोत. जी २० हा जगातील प्रमुख देशांचा समूह असून त्यात अमेरिका, इंग्लंड, रशिया, सौदी अरेबिया, चीन व भारत अशा १९ देशांसह युरोपियन युनियनचा समावेश आहे. एकमेकांमध्ये आर्थिक स्थैर्य, पर्यावरण, हवामान बदल, शाश्वत विकास या मुद्यांवर ते एकत्र येऊन या समस्यांवर मार्ग काढतात. हा समूह इतका मोठा आहे की जगाच्या एकूण सकल उत्पादनापैकी ८० टक्के वाटा जी -२०  यांचा आहे. जागतिक व्यापारात त्यांचा ७५ टक्के वाटा तर जागतिक लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या जी-२० समुहाचीच आहे. त्यांची दरवर्षी एक बैठक होते. इंडोनेशियात नुकतीच बैठक झाली. २०२३ मध्ये ही बैठक भारतात होणार असून त्याच्या नेत्तृत्वाची संधी भारताला लाभली आहे. त्यामुळेच एक प्रकारे विश्व गुरु बनण्याची सुवर्णसंधी भारताला प्राप्त होत आहे.

करोना महामारीचा जगावर खूप प्रतिकूल परिणाम झाला. जशी जगभर  “वर्क फ्रॉम होम” संकल्पनेचा उदय झाला. तसेच जगाला ” वर्क फ्रॉम इंडिया” जास्त किफायतशीर पडत आहे. भारताच्या जागतिक सेवा व्यापारात जोरदार वाढ झालेली आहे. देशातील डिजिटल क्रांती, उर्जा वापरातील वाढ यामुळे सध्याचे दशक भारताचे असेल असे लक्षात येत आहे.

” वसुधैव कुटुंबकम ” असे आपले ब्रिद वाक्य आहे. ते सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे. मात्र देशांतर्गत काही गोष्टी, कामगिरी पहाता अनेक गोष्टींची, समस्यांची आव्हाने आपल्या समोर उभी ठाकलेली आहेत.  त्याची उकल किंवा सोडवणूक करण्याची प्राथमिक गरज आहे. यामध्ये नवी दिल्लीसह विविध शहरांमधील हवेचे, पाण्याचे प्रदुषण हा मोठा अडसर आहे. नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक खूप खराब होता. जगातील ही सर्वाधिक प्रदुषित राजधानी ओळखली जाते. ही गोष्ट लाजिरवाणी आहे.  या प्रदुषणामुळे माणसांचे आयुष्यमान दहा वर्षांनी कमी होते आहे असे संशोधन शिकागो विधापीठाच्या एका संशोधनात व्यक्त केले आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे देशातील प्रदुषणाचा प्रश्न तातडीने हाती घेतला पाहिजे. पंजाब मध्ये सीमालगत भागात भात शेतांमध्ये जाळण्यात येणाऱ्या प्रचंड  कचऱ्याचा हा परिणाम आहे. त्याचप्रमाणे राजधानीत वाहन प्रदुषण लक्षणीय आहे. बांधकाम प्रदुषणाची त्यात भर पड़त असते. याविरुद्ध केंद्र व दिल्लीतील सरकार यांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे. त्याच बरोबर प्रत्येक शहरातील स्वछता, पिण्याचे स्वछ पाणी सर्वाना पुरविण्याची जबाबदारी संबधित सरकारची आहे. एकूणच अन्न, वस्त्र निवारा यासारख्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.

यामुळे आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करण्याबरोबर सर्वाधिक विकास दर गाठण्याचीआवश्यकता आहे. देशातील बेरोजगारीचा प्रश्न , पायाभूत सुविधांमध्ये चांगली वाढ करण्याशिवाय पर्याय नाही. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था सर्वत्र अभिप्रेत आहे. समाज जीवनात शांततेबरोबर  सौहार्दतेचे वातावरण निर्माण केले पाहिजे. धार्मिक सलोखा जपत देशाची एकता, एकात्मता व सार्वभौमत्वाला कोठेही धक्का पोचणार नाही याची दक्षता सर्व पातळ्यांवर घेतली तर मिळालेच्या संधीचे सोने निश्चित होऊ शकेल यात शंका नाही

प्रा. नंदकुमार काकिर्डे 

error: Content is protected !!