चौदा तोळे चोरीला गेलेले, एकच तोळा कसे देताय ? तक्रारदाराचा सवाल
मुंबई: बारा वर्षांपूर्वी माझे चौदा तोळे सोने चोरीला गेले होते, आज तुम्ही एकच तोळे परत करताय, मी विचारू शकतो असे का, असा सवाल शुक्रवारी मुंबई पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांना मालमत्ता वाटपाच्या भर कार्यक्रमात नारायण केरकर (३०) नामक तक्रारदाराने केला. त्यावर आपली एफआयआर मी वाचला असून, त्याबाबत आपली मदत पोलीस नक्कीच करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स येथील तेरापंथ भवनात उत्तर प्रादेशिक विभागाकडून मालमत्ता तक्रारदारांना परत करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुरक्षारक्षक असलेले आणि कुरार पोलिसांच्या हद्दीत राहणारे केरकर तक्रारदार असलेली आई लक्ष्मी केरकर (६२) यांना घेऊन त्याठिकाणी आले होते. परिमंडळ १२ मधील मालमत्ता वाटप झाल्यानंतर कोणाला आपले मनोगत व्यक्त करायचे आहे का, असा सवाल सूत्रसंचालन करणारे पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांनी केला.
कसले श्रेय घेताय? केरकर यांनी २४ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांची आई लक्ष्मी या काही कामानिमित्त १५ मिनिटांसाठी बाहेर गेल्या आणि तेवढ्या वेळात चोरांनी कपाट फोडत दागिने लंपास केले. माझी भावंडे आजारी पडली. वडील धक्क्याने गेले. नुकताच आईलादेखील हार्ट ॲटॅक येऊन गेला आहे. बऱ्याच खेपा टाकल्यानंतर मी पोलीस ठाण्यात जाणेच सोडून दिले. आरोपी स्थानिकच होते आणि त्यांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुलीदेखील दिली होती. त्यानंतर आज जवळपास १२ वर्षांनंतर मला एक तोळे परत देऊन कसले श्रेय घेताय? अशी संतप्त प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली.