क्लीन अप मार्शलना दंडाची रक्कम देण्यापूर्वी गणवेष, विभागाचे नाव इत्यादी बाबींची खातरजमा करुन घ्यावी- महानगरपालिकेचे आवाहन
• तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनामास्क फिरणाऱया व्यक्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱया व्यक्तिंवर कारवाईसाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शल यांना दंडाची रक्कम देण्यापूर्वी, क्लीन अप मार्शलनी गणवेष परिधान केलेला आहे, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक नमूद केला आहे, याची खातरजमा करुन नागरिकांनी दंडाची रक्कम भरावी व पावती देखील घ्यावी. याअनुषंगाने कोणत्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुखपट्टी अर्थात मास्क लावून वावरणे प्रत्येकास बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास रुपये २०० इतका दंड देखील आकारला जातो. मुंबई महानगरामध्ये कोविड १९ विषाणू संसर्ग पुन्हा एकदा वाढीस लागला आहे. त्यामुळे हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱया उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी विनामुखपट्टी अर्थात विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
जे नागरिक मास्क परिधान करणार नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी, प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी एक याप्रमाणे खासगी सुरक्षारक्षक क्लीन अप मार्शल संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांचे क्लीनअप मार्शल गणवेष परिधान केलेले असतात. या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व त्यांचा अनुक्रमांक लिहिलेला असतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा मास्क परिधान न करणे या प्रत्येक उल्लंघनाकरिता रुपये २०० याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाते. त्या दंडाची पावती देखील क्लीनअप मार्शल कडून संबंधित नागरिकास दिली जाते.
सबब, मुंबई महानगरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारची कारवाई होत असताना, क्लीनअप मार्शल यांनी गणवेष परिधान केलेला असणे, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक असणे, तसेच दंडाची पावती देणे या सर्व बाबी आवश्यक आहेत.
संबंधित नागरिकांनी दंडाची रक्कम क्लीनअप मार्शलकडे देण्यापूर्वी या सर्व बाबींची खातरजमा करावी. दंड भरल्यानंतर त्याची पावती आवर्जून घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.