उद्धव ठाकरेंचे विचारच आता फडतूस झालेत
.
भाजपा आ. प्रविण दरेकरांचे सडेतोड प्रत्युत्तर
मुंबई- ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा असे ठाकरे म्हणाले. मात्र ठाकरे यांच्या टिकेला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांचे विचारच आता फडतूस व्हायला लागले असून टोमणे संस्कृतीतून ते काही बाहेर येत नाहीत, असे दरेकर म्हणाले.
दरेकर म्हणाले की, राज्यातील जनतेने किंबहुना आपल्या पक्षातील निवडून आलेल्या आमदारांनी आपली लायकी काय आहे हे उद्धव ठाकरे यांना दाखवून दिले आहे. देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांचे चारित्र्य, काम करण्याची पद्धत राज्याला माहित आहे. पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. ते कार्यश्रम गृहमंत्री आहेत. त्यामुळे बदलण्याची आवश्यकता नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नीट हाताळण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे. आपण फक्त अडीच वर्ष मुख्यमंत्री असून काहीच करू शकला नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वैफल्य आलेय. त्यामुळे फडतूस, थुंकणारी लोकं हे अत्यंत अश्लील, बाष्फळ अशा प्रकारची वक्तव्य उद्धव ठाकरेंची येत असून ते टोमणे संस्कृतीतून काही बाहेर येत नसल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला.
तसेच महाराष्ट्रातील जनतेने याआधीही दाखवून दिले आहे आणि आता येणाऱ्या काळातही सुसंस्कृत राज्यातील जनता अशा प्रकारच्या विकृत पद्धतीच्या विधानांना साथ देणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सरकार बनवले हा फडतूसपणा उद्धव ठाकरे यांनी केला. तुमचा अडीच वर्षाचा काळ तुमच्याच ४० आमदारांनी खेचून घेतला यावरून उद्धव ठाकरेंनी स्वतःची कुवत ओळखावी आणि मगच देवेंद्र फडणवीस, शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करावी, असेही दरेकर म्हणाले