पवार गटाची दुसरी यादी जाहीर
बीड मधून बजरंग सोनावणे तर
भिवंडीतून बाल्यामामा म्हात्रे
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे. त्यानुसार बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत दोनच नावं आहेत. याआधी पहिल्या उमेदवार यादीत शरद पवार गटाने ५ उमेदवार जाहीर केले होते. आता नव्याने दोन उमेदवारांची दुसरी यादी शरद पवार गटाने जाहीर केली आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छूक होते. मात्र, बजरंग सोनावणे यांनी गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती. ज्योती मेटे यांच्यापेक्षा बजरंग सोनावणे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी असलेली यंत्रणा आणि क्षमता हे निकष लक्षात घेता शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना बीडमधून उमेदवारी देऊ केली आहे. बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत रंगेल.
तर भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि शरद पवार गटापैकी कोणाच्या वाट्याला येणार, यावरुन वाद सुरु होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भिवंडीतून काँग्रेसच्या उमेदवाराला लक्षणीय मतं पडली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष भिवंडी मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नव्हता. मात्र, या निवडणुकीत शरद पवार गटाकडे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी, असा शरद पवार गटाचा आग्रह होता. भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना कडवी टक्कर देण्यासाठी बाळ्यामामा योग्य उमेदवार असल्याची अनेकांची भावना आहे. त्यामुळेच शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांच्यातील लढाईत कोण बाजी मारणार, हे आता पाहावे लागेल