मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी जालंदर चकोर यांची निवड
मुंबई शूटिंगबॉल असो.त्रैवार्षिक (२०२४-२७)ची कार्यकारणी निवडण्यात आली असून कार्याध्यक्षपदी मुंबई महानगरपालिका क्रीडाभ वनाचे जालंदर चकोर यांची निवड करण्यात आली. शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असलेल्या तसेच मुंबईला राज्याचा दर्जा असलेल्या मुंबई शूटिंगबॉल (व्हॉलीबॉल)असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ऑगस्ट २०२४ रोजी पराग विद्यालय भांडुप येथे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार शामबाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेत त्रैवार्षिक (२०२४-२७) या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली व सदर कार्यकारणीवर कार्याध्यक्षपदी जालंदर चकोर यांची निवड बहुमताने करण्यात आली.
जालंदर चकोर हे मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन शूटिंगबॉल(व्हॉलीबॉल)संघाचे सन १९९६ पासून प्रतिनिधित्व करीत आहेत. मुंबईच्या संघातूनही त्यांची अनेक वेळा राष्ट्रीय स्पर्धेसाठी यापूर्वी निवड झाली आहे. अखिल भारतीय स्तरावर व राज्यस्तरीय स्तरावर ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या स्पर्धेत मुंबई महापालिका संघाला अनेक वेळा विजेतेपदही त्यांच्या नेतृत्वाखाली मिळवून दिलेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाची धुराही त्यांनी अनेक वेळा सांभाळली आहे व या स्पर्धेत मुंबई संघाला अनेक वेळा विजयी घोडदौड मिळवून दिलेली आहे.
जालंदर चकोर हे मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी असून दि मुनिसिपल को-ऑप. बँक लि.मुंबई या बँकेच्या संचालक पदीही आहेत तसेच तज्ञ संचालक म्हणून दि महाराष्ट्र एम्प्लॉईज बँक्स असो.मुंबई यावरही कार्यरत आहेत. मुंबई व उपनगरात विभागवार राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन करून क्रीडा युवकांना या मैदानी खेळाकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. शालेय पातळीवर अधिकाधिक विद्यार्थ्यांना हा खेळ शिकविण्यासाठी ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू यांना त्या त्या विभागीय शाळांमध्ये पाठविण्यास प्राधान्य देण्यात येईल. शालेय क्रीडापटूंना विशेष नैपुण्य गुण मिळण्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न असेल. मुंबई शूटिंगबॉल (व्हॉलीबॉल) असोसिएशनकडे नोंदणीकृत खेळाडूंना अपघाती विमा संरक्षण मिळविण्याचे प्रयत्न ही सुरू आहेत अशी माहिती कार्याध्यक्ष जालंदर चकोर यांनी दिली.