शामसुंदर महाराज सोन्नर यांनामानवाधिकार पुरस्कार
पुणे – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून मानवाधिकार पुरस्कार या वर्षी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांना जाहीर झाला आहे. मंगळवार, 10 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी दिली.
मानवी मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर आपल्या कीर्तन, प्रवचन, व्याख्यान आणि लेखनातून सतत मानवी हक्काचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करीत असतात. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे, स्री भ्रूण हत्येविरोधात जनजागरण, तुरुंगातील कच्च्या कैद्यांचे प्रबोधन यासाठी ते प्रयत्नशील असतात. शिवाय संविधान आणि संत साहित्यातील परस्पर पुरकता अधोरेखित करणारे त्यांचे संविधान कीर्तन समाजात संविधान जागृतीसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरत आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन आणि कला दालन येथे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, न्यायाधीश सोनल पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, प्रा. डाॅ. उल्हास बापट, प्रा. सुधाकरराव जाधवर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, असेही कुचेकर यांनी सांगितले.
इतर पुरस्कार
डाॅ. पी. ए. इनामदार, श्रीपाद शिवाजी कोंडे देशमुख, महादेव खंडागळे यांना मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तर विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कारांसाठी संस्थांची निवड करण्यात आली आहे. ज्यात लोकायत, संविधान संवादक समिती महाराष्ट्र, युवक क्रांती दल, संविधान परिवार लोक चळवळ आदी संस्थांचा समावेश आहे.
