उद्धव ठाकरे कुटुंबासह मोदींना भेटून आले – शिक्षणमंत्री केसरकर यांचा खळबळजनक दावा
मुंबई: आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघेजण दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च ठरवावे. पण यानिमित्ताने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा भाजपसोबत येण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे, असे केसरकर यांनी म्हटले. त्यांनी मंगळवारी वृत्तवाहिनी’शी संवाद साधताना याबाबत भाष्य केले. काही वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे केसरकर यांनी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचे म्हटले आहे.
रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस यांनी जामनगरला जाताना एकाच विमानाने प्रवास करणे, हा निव्वळ योगायोग होता. त्यामध्ये फार काही विशेष नाही. महत्त्वाची बातमी ही आहे की, शिवसेनेतील ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपसोबत येण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांनुसार, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या बातम्यांचा इन्कार केलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी विचारलेला प्रश्न योग्य आहे. तुम्ही पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, याची गॅरंटी काय? हा प्रश्न योग्य आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. शिवसैनिकांनी आतातरी डोळे उघडले पाहिजेत. महायुती होणार होती. उद्धव ठाकरे दिल्लीत तसं ठरवूनही आले होते. पण त्यांनी शब्द फिरवला. दोनवेळा शब्द फिरवल्यानंतर त्यांना आता जवळ येऊ द्यायचे की नाही, हा निर्णय आता पंतप्रधान मोदींनीच घ्यावा, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.
अंबानी परिवाराने नुकत्याच जामनगर येथे आयोजित केलेल्या जंगी सोहळ्याला अनेक राजकीय व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. ठाकरे कुटुंबीय आणि देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस हे सोहळ्याला आले होते.