ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

विवेकी कीर्तनकार – घडविण्याची धडपड!

पाचवीच्या दिवशी आजी ह.भ.प. तुळसाबाई हिने गळ्यात तुळशीची माळ घातली. लहानपणी मुलांना खेळणी दिली जाते. मी बसायला लागलो तेव्हा आजीनेच छोटा टाळ गळ्यात अडकवला. बोबडे बोल येऊ लागले. आजीने पहिला शब्द “विठ्ठल विठ्ठल ” बोलायला शिकवला. गावातील पारावर चालणारे कीर्तन, भजन, हरिपाठ लहानपणीच आजीच्या मांडीवर ऐकले. वाचायला यायला लागले तेव्हा पहिला ग्रंथ हातात पडला हरिपाठ, पुढे भजनी मालिका, ज्ञानेश्वरी, गाथा!
गावातील पारावर चालणारे रामायण, हरी विजय, पांडव प्रताप आदी ग्रंथ चौथीला असताना वाचू लागलो. सहावी पासून त्याचे निरुपण करू लागलो. आठविला असताना पहिलं कीर्तन केलं.
पुढे दहावी पास झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यावरून घरात थोडा वाद झाला आणि रागात घरं सोडून मुंबई गाठली. शिवनेरचे संपादक विश्वनाथराव वाबळें सारख्या देव माणसाची भेट झाली. (पुढे प्रत्येक वळणावर अशी देव माणसं भेटत गेली) साडे सोहळाव्या वर्षी वर्तमान पत्रात काम करण्याची संधी मिळाली.
मुंबईतील संघर्षमय जीवन, क्राईम रिपोर्टींग, राजकीय पत्रकारिता…. हे सर्व करताना काही काळ भजन, कीर्तन, आध्यात्मिक वाचन कमी झालं. 2001 साली तब्बल अठरा वरर्षानंतर मुंबईतील पाडुरंगाच्या पालखी सोहळ्याची बातमी लिहायला गेलो आणि पुन्हा संत विचारांशी जोडला गेलो.
याच दरम्यान मुंबईत एक वारक-यांचा मोठा लढा पत्रकार म्हणून लढला आणि त्याकाळात पत्रकार कीर्तनकार म्हणून महाराष्ट्राला ओळख झाली. पुन्हा कीर्तन सुरू झाले. छोटे-मोठे वारक-यांचे विषय वर्तमानपत्रातून मांडत गेल्याने फार कमी काळात बाबा महाराज सातारकर, जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष मोठे बाबा, संदीपान महाराज शिंदे, केशव महाराज उकळीवर, रामायणाचार्य ढोक महाराज, डाऊ आंदोलनात बंडा तात्या कराडकर, चैतन्य महाराज देगलूरकर, आचार्य लहवीतकर अशा दिग्गज महाराज मंडळाशी संपर्क वाढला. फार कमी काळात लोकमान्यता मिळाली.
पत्रकारितेने सामाजिक भान आले होते. त्याचे प्रतिबिंब कीर्तनातून उमटायचे. त्यातूनच एखादा प्रश्न घेऊन कीर्तन करू लागलो. स्री भ्रूणहत्येधिरोधात जनजागरण, कैद्यांसाठी प्रबोधन, आत्महत्या करू नयेत म्हणून कीर्तनातून शेतक-यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न. अशा उपक्रमातून सामाजिक प्रश्नांशी लढणा-या संस्था संघटनांशी संपर्क. मग संविधान कीर्तन आणि दिंडी, झी टाॅकीझ वरील कीर्तन मालिकेचा प्रारंभ! त्यात वारकरी चळवळीची उभारणी आणि तत्वज्ञानाची मांडणी. त्यातून लोकांची कीर्तन-व्याख्यानासाठी मोठ्या प्रमाणात मागणी. पत्रकारितेची नोकरी आणि प्रबोधन चळवळ दोन्हीचा मेळ जमेना तेव्हा अखेर 38 वर्षानंतर पत्रकारितेला राम राम. मानधन न ठरविता कीर्तन, व्याख्यान, कवीसंमेलनासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतेने धावा धाव….. अशाच प्रकारचे विचार मांडणारे कीर्तनकार तयार करावेत यासाठी सामाजिक चळवळीतील लोकांचा आग्रह…. छोट्या, छोट्या कार्यशाळांचे नियोजन. कीर्तन मालिकांचे लेखन…. वय साठीच्या उंबरठ्यावर…. सार्वजनिक वाहनातून केलेल्या प्रवाचे शरीरावर परिणाम, प्रकृतीच्या तक्रारी….. भविष्यात फार धावपळ होऊ शकणार नाही याचे संकेत…..
…… म्हणून लवकरात लवकर जास्तीत जास्त विवेकी कीर्तनकार घडावेत यासाठी संत विचार संस्कार शिबीराचे आयोजन. संत विचारांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न.
आतापर्यंत अनेकांची साथ लाभली. असेच सोबत रहा. संत विचारांच्या आधारे आनंदी समाज निर्मितीची पायवाट प्रशस्त करूया!
– ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर
संपर्क:
9594999409
9892673047

error: Content is protected !!