टी २० वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंचा विधान भवनात सत्कार
मुंबई : विश्वविजेत्या टीम इंडियाचा विधानभवनात सत्कार पार पडला. विधानभवनात विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा गौरव सोहळा पार पडला. टी20 विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला.
रोहित शर्मा याने यावेळी मुंबईकर शैलीत सर्वांना अभिवादन करत म्हटलं की, ‘सर्वांना माझा नमस्कार. येथे बोलावल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खूप खूप आभार. आमच्यासाठी विधानभवनात असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार. काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होतं. विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं. 2023 मध्ये संधी हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं नाही, असं नाही तर हे सर्वांमुळे सिद्ध झालं आहे. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यामुळे हे होऊ शकले. प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता. त्याच्या हातात कॅच बसला नसता.. बरं झालं हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी पुढे बसवले असते. सर्वांचे खूप आभार असे रोहित शर्माने सांगितले .