मानसिक स्वास्थ्य आणि संगीत ! -मारुती साळुंखे
दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये पाळला जातो. १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्राचे तत्कालीन महासचिव युजिन ब्रोडी यांच्या सल्ल्यानुसार दरवर्षी १० ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जात आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन पाळण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, सर्वसामान्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागृती करण्याकरिता जागतिक स्तरावर कार्यक्रम करणे.
मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याची गरज का भासली ? तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण जगात सुमारे शंभर कोटी लोक मानसिक विकाराने त्रस्त आहेत, तर दरवर्षी सुमारे ३० लाख लोक दारू पिऊन होणार्या दुष्परिणामाने मृत्युमुखी पडत आहेत आणि दर ४० सेकंदाला जगातील एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. म्हणजेच वर्षाला ८ लाख लोक आत्महत्या करत आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता संपूर्ण जगालाच मानसिक आजाराने ग्रासलेले आहे हे आपल्या लक्षात येईल. मानसिक आजाराची अनेक कारणे आहेत. परंतु मुख्यत्वे करून आर्थिक विषमता, करिअरसाठी स्पर्धा, बदलती जीवनशैली आणि सद्याच्या काळातील कोरोना.
स्वास्थ्य दोन प्रकारचे आहे. एक शारीरिक स्वास्थ्य व दुसरे मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्य हाच शारीरिक स्वास्थ्याचा पाया आहे. जेव्हा मन निरोगी असेल, तेव्हाच शरीर निरोगी असेल. आपल्या जीवनात ७० टक्के रोग हे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे होतात. विचार, भावना व वागणूक हे तीन घटक आपली मानसिक अवस्था सुधारण्याकरिता किंवा बिघडविण्याकरिता कारणीभूत असतात. हे तिन्ही घटक एकमेकांवर अवलंबून असतात. किंबहुना आपले मानसिक आरोग्य हेच तीन घटक ठरवित असतात. मन' ही संकल्पना आहे आणि या संकल्पनेवर अनेक संशोधन झालेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थानातील प्रत्येक पाच महिलांपैकी एक म्हणजे २० टक्के महिला व प्रत्येक १२ पुरुषांपैकी एक म्हणजे सर्वसाधारण ८.५ टक्के पुरुष मानसिक आजाराने त्रस्त आहे. म्हणजेच मानसिक आजाराला बळी पडण्याचे प्रमाण महिलांमध्ये जास्त असल्याचे आपल्या दृष्टीकोनात येईल आणि हे चिंताजनक आहे. तसेच मानसोपचार तज्ञांच्या मते उदासिनता, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता आणि व्यक्तिमत्व विकृती हे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक असते. सध्याच्या काळात ५० टक्के युवकांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे करिअर घडविण्यासाठी करावी लागणारी जीवघेणी स्पर्धा, तसेच अवेळी खाणे, व्यसन इ.मुळे तरुण वयातच होणार्या मोठमोठ्या घडामोडीमुळे तरुण सहजपणे मानसिक तणावाखाली येत आहेत व त्यामधून त्यांना मानसिक आजार होण्याचे प्रमाणही जास्त आहे.गेल्या वीस महिन्याच्या कालावधीत संपूर्ण जग एका विलक्षण रोगाच्या म्हणजे कोरोनाच्या भीतीने मानसिक तणावाखाली वावरत आहे. तज्ञांच्या मते कोरोनाचे संकट गेल्यावरही अनेक लोक मानसिक तणावाखाली वावरताना दिसतील. दिवसेंदिवस वाढत असणारा मानसिक ताणतणाव व त्यातून निर्माण होणार्या समस्यांबाबतच्या गैरसमजुतीपासून मुक्तता मिळावी याकरिता केंद्र सरकारकडून दि. ७ एप्रिल २०१७ रोजी संसदेमध्ये बहुमताने
मानसिक आरोग्य सेवा कायदा’ (MHCA) संमत करण्यात आला व दि.१९ मे २०१८ पासून या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. आपल्या देशात आजही मानसिक आजार असलेली व्यक्ती मानसिक आजार असल्याचे सांगायला लाजते. किंबहुना मानसोपचारतज्ञांकडे जातो म्हटले, तरी त्या व्यक्तीकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे कलुषित नजरेने पाहिले जाते, म्हणून मानसिक आरोग्याकडे कलुषित नजरेने पाहण्यापासून परावृत्त करणार्या काही तरतुदींचा समावेश या कायद्यामध्ये करण्यात आला आहे. तसेच या कायद्याच्या कलम-२ मध्ये तरतूद करण्यात आले आहे की, मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला, शारीरिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती सारखीच वागणूक मिळावी.’ आर्थिक अडचणींमुळे या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे येत आहेत. एका अभ्यासानुसार या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता दरवर्षी रु.९४,००० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. परंतु याला केंद्र व देशातील राज्यांकडून अत्यल्प आर्थिक पाठिंबा मिळत आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात कामाच्या किंवा कार्यालयीन ठिकाणी मानसिक स्वास्थ्य जपणे खूप गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी होत असलेला भेदभाव,कामाचा तणाव, स्पर्धात्मक युग,वेगवेगळ्या शिफ्ट या व इतर अनेक कारणांनी मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे याचा परिणाम कुटुंबावर होण्याची शक्यता असते. यास्तव कामाच्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. यास्तव खास करून पोलीस दल, कॉर्पोरेट सेक्टर, हॉस्पिटल तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी उपक्रम राबवणे आवश्यक आहे.
यावरून आपल्या लक्षात येईल की, कितीही मानसिक ताणतणाव असला तरी माणूस करीअर नावाच्या मृगजळापाठी धावण्याचा थांबणार नाही. म्हणूनच आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळवायचे असेल. तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात संगीतोपचाराचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण संगीतोपचारामध्ये शास्त्रीय संगीत ऐकण्या बरोबरच अनेक सांगीतिक तंत्रांचा उपयोग करून मानसिक तणावाला दूर करून आपले मानसिक स्वास्थ्य सुदृढ करू शकतो. संगीतोपचारामध्ये मानसिक स्वास्थ्याकरिता जी तंत्र आहेत. त्यापैकी ध्वनी ध्यान व ध्वनी स्नान ही दोन अत्यंत उपयुक्त तंत्र असून ध्वनी ध्यान करताना बाहेरील आवाज ऐकत ऐकत आपल्या शरीरातील आवाजाची जाणीव होते. म्हणजे आपल्याला अनाहत नादाचा शोध मिळतो व त्याचा चांगला परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होतो. त्याबरोबरीने ध्वनी स्नान या तंत्रात बासरी किंवा संतूर या वाद्यावरील शास्त्रीय संगीत ऐकवले जाते. याचा आपल्या मनावर व शरीरावर खूप चांगला व सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतो. कारण प्रत्येक वाद्याचा आपल्या मनावर व शरीरावर वेगवेगळे परिणाम होत असतात. बासरी,संतूर,सारंगी व सतार या चारही वाद्याचा मानसिक ताणतणावकरिता चांगला परिणाम होतो. परंतु तुलनेने बासरी व संतूर या दोन वाद्यांचा अधिक जास्त परिणाम जाणवतो. प्रत्येक वाद्याचा ताणतणाव कमी करण्यासाठी कसा परिणाम होतो हे जाणून घ्यायचे झाल्यास बासरी या वाद्यात सातत्याने हवेचा प्रवाह, म्हणजेच फुंकर घातली जाते. म्हणजेच दुखर्या मनावर बासरीच्या माध्यमातून फुंकर घातली जाते. तसेच मनातील साठविलेल्या गोष्टी प्रवाहीत करण्यासाठी संतूर या वाद्याचा उपयोग केला जातो आणि मनामध्ये साचलेल्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी सारंगी या वाद्याचा उपयोग करण्यात येतो. तसेच सतार या वाद्याचा आवाज मेंदूकरिता सकारात्मक हार्मोन्स किंवा सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. यावरून आपल्या लक्षात आले असेल की, या चारही वाद्यांवरील शास्त्रीय संगीत ऐकल्यास त्याचा मानसिक आरोग्याकरिता चांगला परिणाम होतो.
म्हणूनच मानसिक ताणतणावापासून मुक्ती मिळवायची असल्यास आपल्या दैनंदिन जीवनात कमीत कमी २० मिनिटे वेगवेगळ्या वाद्यांवरील वेगवेगळ्या रागांवर आधारित शास्त्रीय संगीत ऐकणे आवश्यक आहे व त्याबरोबरीने रोज अर्धा तास अभंग ऐकल्यास आपल्या हृदयाचे कार्य सुरळीत राहते.
मानसिक स्वास्थ्य मिळवणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे हे आपण समजतो. परंतु हा मूलभूत हक्क आपल्याला स्वत:लाच मिळवायचा आहे, तो दुसर्याकडून घेता येत नाही किंवा दुसर्याला देता येत नाही. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचे उत्तरदायित्व केवळ व्यक्ती नसून, समाज, देश व राज्य यावर सुद्धा आहे आणि यालाच आपण `सामाजिक स्वास्थ्य’ म्हणतो.
-मारुती साळुंखे (80800 31133) संगीतोपचार तज्ञ व एनएलपी प्रॅक्टिशनर,
salunkhems1964@gmail.com