ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
विश्लेषण

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नवीन कामगार कायद्यांबाबत कार्यकर्त्यांसाठी महत्वपूर्ण कार्यशाळा संपन्न

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्याचे रूपांतर चार लेबर कोडमध्ये केले आहे. ऑक्टोबर २०२१ पासून देशभर हे नवीन लेबर कोड लागू होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ वर्कर्स एज्युकेशनच्या सहकार्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईस युनियनने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी बलार्ड पिअर येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप सभागृहात कामगार कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते . या कार्यशाळेचे उदघाटन युनियनचे ज्येष्ठ कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये यांनी केले. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की , केंद्र सरकारचे शेतकरी व कामगार विरोधी धोरण आहे, याविरुद्ध सर्व केंद्रीय कामगार संघटना व शेतकरी एकजुटीने लढा देत आहेत. या एकजुटीमुळेच शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय मिळेल, अशी अशा आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टचे सचिव श्री. यु. आर. मोहन राजू यांनी कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना सांगितले की, कामगार व अधिकारी यांच्यामध्ये ज्ञानाचा अभाव दिसतो, परादीप व चेन्नई पोर्ट मधील उदाहरणे देऊन, जर कामगारांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर, ज्ञान व शैक्षणिक पात्रता वाढविली पाहिजे. युनियनचे सरचिटणीस व दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री. सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतातील प्रमुख बारा बंदरापैकी सात बंदराचे खाजगीकरण होणार असून, पोर्ट, रेल्वे, बँक, विमा, बी. पी.सी. एल. या उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. कामगारांना आपल्या हक्काची व कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणून कामगार शिक्षण महत्वाचे आहे.
या कार्यशाळेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्कर्स एज्युकेशनचे उप संचालक श्री. योगेश चाटी यांनी नवीन कामगार कायद्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, कामगार हिताचे संरक्षण कमी केले असून मालकांना जास्त संरक्षण दिलेले आहे. सध्या जागतिक कोरोना महामारीचे संकट आहे. काही उद्योग बंद होत आहेत, त्यामुळे अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काही उद्योग वाढत आहेत, पण नोकऱ्या नाहीत, त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. कामगार संघटना जेवढी मजबूत तेवढे कामगारांना चांगले पगार व सुविधा मिळतात. औरंगाबाद येथील ऍण्डयुरन्स टेक्नॉलॉजीस लिमिटेडचे मुख्य मानव संसाधन विकास अधिकारी श्री. मनोज राजीमवाले यांनी कामगार कायद्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, ४४ कामगार कायद्याचे चार कायद्यात रूपांतर केले त्यावेळेस त्रिपक्ष समितीबरोबर चर्चा न केल्यामुळे या कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत. औद्योगिक संबंध कायद्यात देखील खूप गोंधळ आहे. त्यामुळे भविष्यात कामगारांवर त्याचे गंभीर परिणाम होतील. याप्रसंगी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेच्या अभ्यास पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कामगार कार्यशाळेत उपस्थित सर्व युनियन पदाधिकारी व कामगार कार्यकर्त्यांना नव्या चार लेबर कोडमधील अनेक तरतूदी संदर्भात अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन करण्यात आले. तर स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवा निमित्त मंडळाच्या मुख्य ग्रंथपाल डॉ. अस्मिता देशमुख यांनी समयोचित असे मार्गदर्शन करून सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचे स्वागत युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन युनियनचे संघटक चिटणीस बाळकृष्ण लोहोटे यांनी केले तर आभार युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांनी मानले.

error: Content is protected !!