ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

सत्तापदापेक्षा संघटनाविस्तारात रमणारा भाई…

 

ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण, हा. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मूलमंत्र अनुसरत सत्तापदापेक्षा संघटना विस्तारात मनस्वी आनंद मानणारे भाई
म्हणजे नगरविकास मंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे हे होय. कडवट शिवसैनिकांच्या फळीतून पुढे आलेले नेतृत्व संघटना हेच आपला श्वास आणि प्राण मानते. ठाणे शहरातील शिवसेना शाखाप्रमुख ते नगरसेवक, सभागृह नेता, आमदार, अल्पकालीन विरोधी पक्षनेता आणि दोन टर्म मंत्री हा त्यांचा प्रवास संघटनाशास्त्र अभ्यासकांनी जरूर अभ्यासणाजोगा आहे. आमदारकी इतकेच किंबहूना त्यापेक्षा जास्त महत्व आणि वेळ शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदाला देत त्यांनी मजबूत पक्षसंघटन म्हणजे काय असते याची प्रचिती सर्वांना दिली.

 मा. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास हे दोन्ही घटक भाईंना आयुष्याच्या निर्णायक टप्प्यावर गवसल्याने पुढचा मार्ग त्यांना समाजकारणाच्या दिशेनेच घेऊन गेला. सन २००४ साली विधानसभा निवडणूक पहिल्यांदा लढवून ते आमदार झाले. त्यानंतर सातत्याने ते २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चौथ्यांदा ठाणे शहरवासियांचे विधानसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत मताधिक्याची वाढती श्रेणी ही ठाणेकरांची त्यांना असलेली पसंती आणि त्यांच्या कामावर असलेलं ठाणेकरांचं प्रेम अधोरेखित करणारी आहे.'शिवसेनेचे ठाणे' अशी ओळख निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा कोणीही नाकारू शकणार नाही.

 मुंबईचं प्रवेशद्वार मानला जाणारा ठाणे जिल्हा लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे. मा.श्री.प्रकाश परांजपे आणि त्यानंतर 

मा.श्री. आनंद परांजपे यांनी सातत्याने ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या माध्यमातून विजय संपादन केला. “ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख” धर्मवीर आनंद दिघे यांच्या निधनानंतर सन २००४ ची लोकसभा निवडणूक आणि त्याची ठाणे जिल्ह्यातील प्रचाराची आघाडी उभारणे हे एक मोठे आव्हान होते. मा.श्री. एकनाथ शिंदे आणि पदाधिकाऱ्यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले. मा.श्री. प्रकाश परांजपे हे विधानपरिषद उप सभापती मा.श्री. वसंतराव डावखरे यांचा पराभव करून लोकसभेत पोहोचले. विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेल्यावर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारीही मा.श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली. अशाप्रकारे दोन्ही पदे भुषविणारे ते पहिले शिवसैनिक ठरले कारण मा. शिवसेनाप्रमुखांचा त्यांनी संपादन केलेला विश्वास तसेच धर्मवीर आनंद दिघेंप्रमाणे संघटनेसाठी सर्वस्व झोकून काम करण्याची त्यांच्या अंगी असलेली धडाडी ! म्हणूनच तर ते आज “जेथे गवताला भाले फुटतात” अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्रात “बेबंदशाही”ला मूठमाती देत “वाडा चिरेबंदी” भक्कम करीत पक्ष तटबंदीचे बुरुज सक्षमपणे राखत आहेत.

सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागात जावळीतील दरेगावचा त्यांचा जन्म आहे. बाल्यावस्थेत असतांनाच ते ठाण्यात वास्तव्यास आले. महाविद्यालयीन शिक्षण परिस्थितीमुळे अर्धवट सोडावे लागले. उपजीवीकेसाठी कष्टाची अनेक कामे केली. संघर्षातून समाजकारणात पुढे येत आता सत्तापदावर काम करीत असतांना जुन्या साथीदारांना ते विसरलेले नाहीत. त्यामुळेच, "शिवा दिवटे कुठे आहे, कालपासून दिसला नाही... अरे डॉक्टर कवळे, त्या शिवाला फोन लावा..." अशी त्यांची आरोळी मंत्रालयीन बैठका आणि दौरे यांच्या व्यस्त दिनक्रमातही ऐकू येते. अधिवेशनकाळात विधीमंडळ शिवसेना पक्ष कार्यालयात भोजनव्यवस्थेची धुरा अगत्याने वाहणारे शाशीभाऊ स्वत: जेवले की नाही, हे आठवणीने विचारणारे भाईच...परिस्थितीने तेव्हा शिक्षण घेता आले नाही या नकारात्मकतेवर वयाच्या 

पन्नाशीनंतर पदवीधर होऊन त्यांनी सकारात्मक मात केली. शिक्षणासाठी सवड मिळत नाही अशी सबब सांगणाऱ्यांनी या उदाहरणातून प्रेरणा घ्यायला हवी.

ठाण्याबरोबरच गडचिरोली जिल्ह्याचे पालमंत्रीपद ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. क्लस्टर, एलिव्हेटेड मार्ग, मेट्रो, उड्डाणपूल अशी प्रगत नागरी सोयी-सुविधांची मालिका असणारा ठाणे जिल्हा आणि दुसरीकडे अतीदुर्गम आदिवासी आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा...कामाची धडाडी, अविश्रांत परिश्रमी स्वभावधर्म आणि विकासात्मक बदलासाठी आग्रह ही त्यांच्या कार्यपध्दतीची वैशिष्ट्ये त्यामुळेच आपल्या मनात भरतात.

ऐंशी टक्के समाजकारणाचा आग्रह धरतांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा वगळून कसे चालेल? यामुळेच ते स्वत: आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ही संकल्पना अतिशय यशस्वीपणे राबविली जात आहे. पूर्वाश्रमीचे पत्रकारमित्र श्री. मंगेश चिवटे त्यासाठी परिश्रम घेत असून कोविडकाळात स्वत: मंत्री महोदयांनी आघाडीवर येत केलेले कार्य केवळ ठाणेकरच नव्हे तर संपूर्ण देशवासियांनी बघितले आहे.

मा.शिवसेनापमुखांना अभिप्रेत असलेल्या समाजकारणाभिमुख राजकारणाचा प्रगट अविष्कार म्हणजे एकनाथ शिंदे ! वीस वर्षांपूर्वी धर्मवीर आनंद दिघे एका अपघाताचे निमित्त होवून सर्वांना सोडून गेले. त्यावेळी मा.शिवसेनाप्रमुख आदरांजली वाहतांना म्हणाले होते, "आनंदच्या दाढीचा ठाण्यात एक  दरारा होता..." आज आनंद दिघे यांचे उत्तराधिकारी असलेल्या आणि मंत्रीपदाची शपथ घेतांना त्यांचे उच्चरवात संस्मरण करणाऱ्या 

मा.श्री. एकनाथ शिंदे यांनी हा वसा आणि वारसा त्याच ताकदीने पुढे नेला आहे, वाढविला आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा…

  • निलेश मदाने,जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
error: Content is protected !!