आदित्य ठाकरेंच्या सभेत राडा
वैजापूर – आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान घेण्यात आलेल्या सभेत आज राडा झाला यावेळी जमावाने ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचं समजतेय. महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाली. अशात बाहेर काही काळ गोंधळ बघायला मिळाला. काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आलेय. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे. यामुळे काही वेळ तिथं तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
आदित्य ठाकरे आज महालगाव, वैजापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची सभा झाली. त्यावेळी त्यांच्या गाडीवर आणि सभेच्या ठिकाणी किरकोळ दगडफेक झाल्याचं समोर आलेय. महालगाव येथे शिवसंवाद यात्रेचा मेळावा होत असताना या बाजूलाच रमाबाई यांची जयंती साजरी केली जात होती. सभा सुरु असल्याने बाजूला रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त सुरु असलेली मिरवणूक आणि डीजे थांबवण्याची विनंती पोलिसांनी भीमसैनिकांना केली. यावेळी चिडलेल्या भीमसैनिकांनी रोष व्यक्त करत सभेच्या दिशेने किरकोळ दगड स्टेजवर फेकले. परिसरात तणाव झाल्याचं बघता यावेळी चंद्रकांत खैरेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं. आदित्य ठाकरे भाषणाला उभे राहताच त्यांनी स्टेजवर भाषण न करता खाली उतरून भाषण केलं. भाषणाच्या सुरवातीलाच आदित्य यांनी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही डीजे वाजवून जयंती साजरी करा, असं देखील म्हटले. भीमशक्ती-शिवशक्ती एकच आहे, तुम्हाला जर डीजे वाजवायचा असेल तर वाजवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.