कथा अर्शद वारसीची ” पंप अँड डम्प”च्या भानगडीची !
मुन्नाभाई एमबीबीएस, गोलमाल किंवा इष्किया या हिंदी चित्रपटात विनोदी भूमिका करणारा लोकप्रिय अभिनेता अर्शद हुसेन वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी यांच्यासह सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या एकूण 45 जणांवर दि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे “सेबी”ने नुकतीच पुढील आदेश देईपर्यंत शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य कोणतेही व्यवहार करण्यावर त्वरीत बंदी घातली आहे. शेअर बाजारात ओळखल्या जाणाऱ्या “पंप अँड डंप ” भानगडीचा घेतलेला हा मागोवा.
शेअर बाजारात गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणावर झालेल्या या फसवणुकीची घटना घडली ती साधना ब्रॉडकास्ट कंपनीच्या संदर्भात. ही कंपनी 1994 मध्ये नवी दिल्ली येथे स्थापन झाली. या कंपनीचे शेअर्स मुंबई शेअर बाजारावर जानेवारी २०१८मध्ये नोंदवण्यात आले. प्रथम हा दहा रुपये दर्शनी किमतीचा शेअर होता पण नंतर तो स्प्लिट करून त्याचे एक रुपयाचे शेअर्स करण्यात आले. या कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये गौरव गुप्ता, श्रेया गुप्ता, पूजा अग्रवाल, वरुण मीडिया कंपनी, ताजिंदर कौर व सौरभ गुप्ता ही मंडळी आहेत. या कंपनीच्या शेअरच्या किमती एप्रिल 2022 ते जुलै 2022 च्या दरम्यान कृत्रिमरित्या वर नेण्यात आल्या व त्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले होते. सेबीकडे काही तक्रारी करण्यात आल्या होत्या. यूट्यूबच्या माध्यमातून जुलै 2022 मध्ये “दि ॲडव्हायझर” आणि “मनी वाईज” या चॅनलने दोन व्हिडिओ अपलोड केले. “दि ॲडव्हायझर” चे आठ लाख गुंतवणूकदार ग्राहक तर “मनीवाईज” यांचे ७ लाख ४६ हजार ग्राहक आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून ते गुंतवणूकदारांना सल्ला, शिफारस करीत असतात. या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी कंपनीच्या बाबतीत खोटी, चुकीची माहिती देण्यात आली.त्याच्या जाहिरातीवर तब्बल 4.72 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
त्यात शिफारसीमध्ये “साधना”कडे 5जी चे लायसन्स आहे, अदानी उद्योग समूह ही कंपनी ताब्यात घेणार आहे. पुढील काळात ही कंपनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरणार असून एका मोठ्या अमेरिकन कॉर्पोरेशनने त्यांच्याशी अकराशे कोटी रुपयांचा करार केलेला आहे. ही कंपनी चार भव्य धार्मिक चित्रपट निर्माण करणार आहेत व त्याचे सर्व अधिकार “साधनाकडे”च राहणार आहेत. या कंपनीत मोठ्या म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केलेली आहे. प्रवर्तक त्यांचे भाग भांडवल वाढवत आहेत व या शेअरचा भाव तीन महिन्यात 76 रुपये तर वर्षभरात 340 रुपयांवर जाईल अशा प्रकारच्या प्रचार करण्यात आला होता. कंपनीच्या प्रवर्तकांनी जाणून-बुजून चुकीची व फसवणारी माहिती या व्हिडिओद्वारे गुंतवणूकदारांमध्ये पसरवली व या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केलेली होती. एका बाजूला गुंतवणूकदारांना या कंपनीत या कंपनीचे शेअर्स घेण्याची शिफारस केली जात असतानाच कंपनीच्या प्रवर्तकांनी विविध व्यवहारांद्वारे या शेअरची विक्री मोठ्या प्रमाणावर केली आणि त्यात कोट्यावधी रुपयांचा नफा मिळवला. अगदी २ रुपयापासून या शेअरची किंमत सातत्याने वर नेली. यादरम्यान अर्षद वारसी व त्याच्या पत्नीने काही लाख शेअर्सची खरेदी विक्री केली. त्यांचे प्रवर्तकांशी जवळचे संबंध होते. एकमेकांच्या दूरध्वनी वरून केलेल्या याबाबतच्या संभाषणाच्या ध्वनिफीत सेबीकडे उपलब्ध आहेत. या सर्व व्यवहारांची तपशीलवार नोंद सेबीने मिळवलेली आहे. एकंदरीत प्रवर्तकांनी शेअर बाजारातील काही व्यक्तींच्या मदतीने या कंपनीच्या खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी केली व लाखो रुपयांचा फायदा, नफा मिळवला. सेबीने या सर्वांना दंड आकारला असून या प्रकरणात जवळजवळ 42 कोटी रुपयांचा बेकायदा नफा मिळवण्याचा त्यांचा दावा आहे.
साधना ब्रॉडकास्ट आणि शार्प लाईन ब्रॉडकास्ट अशा दोन कंपन्यांचे शेअर्स बाजारामध्ये खरेदीसाठी उपलब्ध होते. अर्शद वारसी आणि त्याची बायको मारिया गोरेट्टी यांनी या व्यवहारात अनुक्रमे 29.43 लाख रुपये तर 37.56 लाख रुपये नफा कमावला असे सेबीचे प्रतिपादन आहे.
आपल्या भांडवली बाजारामध्ये प्राथमिक शेअर बाजार व दुय्यम शेअर बाजार असे दोन भाग पडतात. प्राथमिक शेअर बाजार म्हणजे ज्या बाजारात एखादी कंपनी त्यांच्या शेअरची किंवा कर्जरोख्यांची खोली विक्री खुली विक्री थेट गुंतवणूकदारांना करते तो प्राथमिक भांडवली बाजार समजला जातो. त्याला प्रायमरी मार्केट असे म्हणतात. तसेच एखाद्या कंपनीच्या शेअरची नोंदणी शेअर बाजारावर झाली की त्यात दररोज खरेदी विक्रीचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात त्या बाजाराला दुय्यम बाजार किंवा सेकंडरी मार्केट, शेअर बाजार असे म्हणतात. येथे दररोज शेअरची खरेदी व विक्री फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या दररोज साधारणपणे तीन चार हजार कंपन्यांच्या लाखो शेअर्समध्ये कोट्यवधीचे व्यवहार दररोज होत असतात. देशभरातील लाखो छोट्या गुंतवणूकदारांना त्याचा अभ्यास करून, माहिती घेऊन गुंतवणूक करावेसे वाटत असते. हे गुंतवणूकदार अनेक वेळा वृत्तपत्रे, मासिके, यू ट्यूब, किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूक करत असतात. अशावेळी गुंतवणूकदारांना फसवण्याच्या उद्देशाने एखाद्या कंपनीची शेअर बाजारातील किंमत चढवत किंवा वाढवत राहणे आणि गुंतवणूकदार चढ्या किमतीला शेअर घेत असताना कंपनीच्या प्रवर्तक किंवा त्यांच्या हितसंबंधीयांनी त्यांचे शेअर्स बाजारात विकणे, त्याचा गैरफायदा घेणे या प्रकाराला “पंप आणि डम्प” असे म्हटले जाते. खरे तर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा व्यवहारांना सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया( सेबीची) कोणतीही मान्यता नाही. तरीही अशा प्रकारच्या कृती करत राहून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे उद्योग आपल्या देशात राजरोस सुरू असतात. असाच फसवणुकीचा प्रकार अर्शद वारसी व त्याची पत्नी यांनी प्रवर्तकांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
असाच एक प्रकार कॅल्स रिफायनरी नावाच्या एका कंपनीत नुकताच घडला. ही कंपनी पश्चिम बंगालमध्ये तेलाच्या निर्मिती क्षेत्रात उतरणार आहे अशी बातमी खुद्द प्रवर्तकांनी बाजारात पसरवली. त्यावेळी या शेअरचा भाव केवळ एक ते दोन रुपये होता आणि ही बातमी बाजारात आल्यानंतर त्याचा भाव प्रचंड वर गेला आणि लाखो शेअर्सची खरेदी विक्री करण्यात आली व गुंतवणूक दाराना गंडा घालण्यात आला. कंपनीच्या प्रवर्तकांनी मात्र या साऱ्या गोष्टी पूर्णपणे नाकारलेले आहेत तसेच अर्शद वारसी यांनीही आपल्याला शेअर बाजारातले काहीही कळत नसून आपलाच आपलीच मोठी रक्कम यात मातीमोल झाली आहे असा असे ट्विट केले आहे.
अर्शद वारसी प्रकरणापासून सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे. कोणतीही कंपनीचे शेअर्स विकण्याची किंवा घेण्याची कोणी शिफारस केली तर त्यामागे काय नेमकं कारण आहे. त्याची सत्यता तपासली पाहिजे. जी कारणे सांगितले ती खरी आहेत का, कंपनी खरोखरच अशा पद्धतीचा काही व्यवसाय करत आहे किंवा कसे हे पहिले पाहिजे. खोट्या बातम्या पसरवल्या जातात आणि लोक फसवले जातात. अदानी प्रकरणामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झालेला असतानाच अर्शद वारसीचे प्रकरण अंजन घालणारे आहे. शेअर बाजार कळत नसेल तर चांगल्या कामगिरी करणाऱ्या मुच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
प्रा. नंदकुमार काकिर्डे