महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळ कायम – पुढील आठवड्यात जागा वाटप
मुंबई- मुंबईतल्या हॉटेल फोर सिझनमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. लोकसभेच्या ४८ जागांवर महाविकास आघाडीसह वंचितचाही फॉर्म्युला निश्चित होईल अशी शक्यता होती. मात्र ४ तास खलबतं करुनही अंतिम फॉर्म्युला काही महाविकास आघाडीनं जाहीर केलेला नाही. मात्र महाविकास आघाडीचे २ फॉर्म्युल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. यातील पहिल्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरेंची शिवसेना 23 जागा, काँग्रेस १५ जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळू शकतात. हा फॉर्म्युला मविआतील 3 प्रमुख पक्षांचा आहे. आता जर प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी सोबत आलीच तर दुसरा फॉर्म्युल्यानुसार, ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला १५ जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा आणि वंचित आघाडीला 3 जागा मिळू शकतात.
महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकरही हजर होते. मात्र सर्व जागांवर सकारात्मक चर्चा झाली असं सांगून मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय. दुसरीकडे आधी बैठकीला जाणार नाही असं सांगून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिले आणि तासभरातच आंबेडकर बैठकीतून बाहेरही पडले. आंबेडकरांनी बैठकीतून बाहेर येताच अजून काही ठरलेलं नाही हेही सांगितलं. म्हणजेच वंचितच्या दृष्टिनं बैठक सकारात्मक नव्हती.
आणखी एक बैठक होईल, त्या बैठकीत सर्व ठरेल असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. ही बैठक ९ तारखेला होण्याची शक्यता आहे. याआधी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितकडून दिलेल्या प्रस्तावात 2 प्रमुख बाबी समोर ठेवण्यात आल्यात. एकट्या वंचितनं आणखी २७ जागांवर तयारी झाल्याचं म्हणत अधिक जागांचा दबाव टाकलेला आहे. त्यासोबतच निवडणूक आल्यावर भाजपसोबत जाणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून द्या अशी अट आंबेडकरांची आहे. पण प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबतच आहेत, असा दावा राऊत वारंवार करतायत.