विरार मध्ये भिंत कोसळून 3 मजूर ठार
मुंबई: विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळून तीन महिला मजूरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी 3.30 तीन वाजताची आहे. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीच फायलिंगच काम चालू होतं. त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
विरारमध्ये आजचा दिवस कामगारांच्या जिवावर बेतला आहे. विरार पूर्वेच्या स्टेशन जवळील स्नेहांजली इमारतीच्या बाजूला एका चालू बांधकामचं फायलिंगचं काम सुरु होतं. फायलिंगपासून चौदा फुट उंच भिंतीच काम सुरु होतं. दुपारी 3.30 च्या सुमारास अचानक एका बाजूची भिंत कोसळली. तेथे काम करणारे पाच मजूर त्या भिंतीखाली दबले गेले. या घटनेत तीन महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शाहूबाई अशोक सुळे (वय 45), लक्ष्मीबाई बालाजी गावाने (वय 45), राधाबाई एकनाथ नावघरे ( वय 40) असे मयत झालेल्या महिला कामगारांची नाव आहेत. तर यात एक महिला नंदाबाई अशोक गव्हाणे (वय 32) आणि एक पुरुष मजूर जखमी झाले आहेत. त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या ठिकाणी एकूण 12 मजूर काम करत होते. काही जण बाहेर निघाल्यामुळे ते वाचले.
वि रारमध्ये सूर्यकिरण नावाची जुनी इमारत होती. सात वर्षापूर्वी ती पुनर्विकासासाठी बिल्डराला दिली होती. सात वर्षानंतर बिल्डरांने नवीन इमारत बांधण्यास घेतले होते. मात्र बिल्डराने सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना आखल्या नव्हत्या. तसेच भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप जुन्या रहिवाशांनी केला आहे.
मृत सर्व मजूर हे नाका कामगार आहेत. हे सर्वजण मराठवाडा नांदेड, परभणी येथील मूळचे रहिवाशी आहेत. कामासाठी ते वसई, नालासोपारा, विरार परिसरात नाका कामगार म्हणून काम करीत होते.