मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने तणाव -हिंदुत्ववादी संतापले ! आज कोल्हापूर बंद
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. दोन गटाचे लोक एकमेका विरोधात उभे ठाकले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तर संबंधितांवर कारवाई सुरू झाली असल्याने बंद केला जाऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
शहरातील सदर बाजारसह अन्य काही परिसरातील लोकांनी स्टेटसवर औरंगजेबाचे स्टेटस लावले होते. त्यावर आक्षेपार्य मजकूर लिहिला होता. ही माहिती समजल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर जमले. त्यांनी घोषणाबाजी सुरू करीत आक्षेपार्य स्टेटस लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत ठिय्या आंदोलन सुरू केले.दगडफेकीने तणाव; लाठीमार
थोड्या वेळानंतर हा जमाव लक्ष्मीपुरी मंडई, अकबर मोहल्ला, मुस्लिम बोर्डिंग, सीपीआर रुग्णालय परिसरात फिरला. तेथे विशिष्ट समाजाच्या दुकान, हातगाड्या, घरांवर दगडफेक करण्यात आली. काही ठिकाणी दोन्ही गटाचे लोक समोरासमोर आल्याने बाका प्रसंग उद्भवला होता. पोलिसांनी दोन्ही जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला.
यानंतरही ठिकठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठाम राहिले. तर बंडा साळुंखे यांनी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी या मागणीसाठी उद्या बुधवारी कोल्हापूर बंदचे आवाहन करण्यात येत असल्याची घोषणा केली. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधित युवकांची घरपकड सुरू केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आक्षेपार्ह स्टेटस लावलेले अल्पवयीन युवक आहेत. त्यांची चौकशी सुरू केली आहे. संबंधितांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्याचा बंद करण्यात येऊ नये, असे आवाहन केले. तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.