आदीपुरुष मध्ये हिंदू देव देवतांची बदनामी भाजपचा आंदोलनाचा इशारा
मुंबई- आदीपुरुष या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे . कारण यात हिंदू देव देवतांची चुकीची प्रतिमा रंगवण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळली नाही तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे .
आधी भाजप,हिंदू महासभा आणि युजर्सनी सैफ अली खानच्या रावण भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने त्याच्या लुकची तुलना खिलजीशी केली आहे.तर आता मराठी अभिनेता देवदत्त नागे यांनी साकारलेल्या हनुमान पात्रावर आक्षेप घेतला जात आहे.१२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार्या या चित्रपटातील हनुमान पात्राला मिशी शिवाय दाढी दाखवली आहे. तसेच त्याची अंगवस्त्रे चामड्याची दाखवली आहे.यावर कुणी हिंदू मिशी शिवाय दाढी राखतो का असा टीकात्मक सवाल सोशल मीडियावर युजर्सनी केला आहे.मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ओम राऊत यांना पत्र लिहून चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये आणि कंटेंट काढून टाकण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.गृहमंत्री म्हणाले की,चित्रपटात हिंदू धर्माच्या श्रद्धेला पायदळी तुडवणारी आणि धार्मिक भावना दुखावणारी अनेक आक्षेपार्ह दृश्ये आहेत.यावर मी चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक ओम राऊत यांना पत्र लिहीत आहे.त्यानंतरही आक्षेपार्ह दृश्ये हटवली नाहीत, तर कायदेशीर कारवाईचा विचार केला जाईल.