भोईवाड्यात एस आर ए च्या इमारतींना गळती वर्ष झाले तरी तक्रार अर्जाची दखल नाही- छत कमजोर झाल्याने कोसळण्याचा धोका
मुंबई – एस आर ए अर्थात स्लम रिहॅबलेशन ऑथरेटी! ज्याला मराठीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणतात . पण झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याच्या नावाखाली एस आर ए आणि बिल्डर यांची अभद्र युती कशा प्रकारे लोकांची फसवणूक करीत आहे आणि निकृष्ट बांधकाम असलेल्या इमारतींमध्ये लोकांना सदनिका देऊन कशाप्रकारे त्यांच्या जीवाशी खेळत आहेत याचे भयंकर उदाहरण मुंबईच्या परेल – भोईवाडा येथील एस आर ए च्या इमारतींमध्ये बघायला मिळत आहे.
भोईवाड्याच्या जेरबाई वाडिया मार्गावर असलेल्या ५ हजार झोपड्यांचे एस आर ए योजने अंतर्गत २२ मजल्यांच्या ६ इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले. मात्र या इमारती बांधून जेमतेम ६ते ७ वर्ष झालेली असताना या इमारतींना गळती लागलेली आहे. ओमकार बिल्डरने या इमारती बांधल्या आहेत .मात्र या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळायच्या आतच या इमारतींना गळती लागली आहे . या सहा इमारतींपैकी इमारत क्रमांक ५ मध्ये बापू अण्णा जाधव नावाचे गृहस्थ ४१८ क्रमांकाच्या सदनिकेत राहतात . पण गेल्या दीड र्षांपासून त्यांच्या घरामध्ये ६ ठिकाणी गळती लागली आहे .याबाबत त्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये एस आर ए कडे लेखी तक्रार केली होती. पण वर्ष व्हायला आले तरी त्यांच्या तक्ररीची एस आर ए प्राधिकरणाने दखल घेतलेली नाही . गळतीमुळे छत कमजोर झालेय.ते कोसळून जीवित हानी होण्याचा धोका आहे . पण एस आर ए च्या अधिकाऱ्यांना त्याची काहीच पडलेली नाही . एस आर ए चे अधिकारी हे बिल्डरचे दलाल आहेत, असा गंभीर आरोप जाधव यांनी केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जाधव हे व्यवसायाने पत्रकार आहेत . त्यांनी एस आर ए कडे गेल्या वर्षी लेखी तक्रार नोंदवली पण एस आर ए च्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारच्या सेवा हमी कायदयान्वये, एस आर ए च्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि जाधव यांच्या घराला लागलेली गळती तात्काळ दुरुस्त करून थांबवावी. अशी मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.