श्री सिद्धी क्रीडा मंडळाचा थरारक विजय
श्री सिद्धी क्रीडा मंडळाचा थरारक विजय
मुंबई : बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पुरुष अ गटाच्या सलामीच्या लढतीत दहिसरच्या श्री सिद्धी क्रीडा मंडळाने थरारक लढतीत शेवटी सुवर्ण चढाईत गोरेगावच्या सह्याद्री क्रीडा मंडळाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांचे समान गुण झाल्यामुळे सामन्याचा निकाल ५-५ चढायांच्या जादा डावात लावण्यात आला. त्यात देखील दोन्ही संघांची ६-६ गुणांची बरोबरी झाल्यामुळे शेवटी सामन्याचा निकाल सुवर्ण चढाईत लावण्यात आला. त्यामध्ये सह्याद्रीच्या सौरभ पार्टेची श्री सिद्धी संघाने यशस्वी पकड करून अखेर सामन्यात बाजी मारली. शिवम सिंग, सागर सुर्वे, प्रकाश जांगीड श्री सिद्धीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पराभूत संघाचे सौरभ पार्टे, मनीष यादव चमकले. दुसऱ्या सामन्यात मात्र ओमसाई क्रीडा मंडळाने श्री स्वामी समर्थचा २६-९ गुणांनी आरामात पराभव केला. विजयी संघाच्या ओमकार संघानेने आपल्या शानदार अष्टपैलू खेळाची चमक दाखवली. त्याला किरण घाडगेने चांगली साथ दिली. नवजीवन क्रीडा मंडळाने अभिनव संघावर रंगतदार सामन्यात अवघ्या एका गुणांनी विजय मिळवला. विश्रांतीला पिछाडीवर पडलेल्या नवजीवनने सामन्याच्या दुसऱ्या सत्रात जोरदार कमबॅक केले. त्यांच्या विजयात तुफानी चढाया करणारा अक्षय बंगेराचा मोठा वाटा होता. अभिनवच्या निखिल जाधवची लढत एकाकी ठरली. अभिनव आणि स्वामी समर्थ संघाने आपल्या सलामीच्या लढतीत दमदार विजय मिळवले. परंतु दुसऱ्या फेरीत मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेत दुसऱ्या दिवशी सामने रंगतदार आणि चुरशीचे झाल्यामुळे कबड्डी प्रेमींना चांगल्या खेळाची झलक बघायला मिळाली.
पहिल्या फेरीच्या लढतीत नव महाराष्ट्र संघ आणि प्रशांत क्रीडा मंडळ हे बोरीवलीचे दोन्ही संघ सामन्यासाठी वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्या विरूद्धच्या प्रतिस्पर्धी ओमसाई, नवजीवन या संघांना पुढे चाल देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला.