ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबई

मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाविरुद्ध गोदी कामगारांची इंदिरा गोदीत प्रचंड निदर्शने


मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतातील प्रमुख बंदरातील कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणाऱ्या पगारवाढसाठी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने द्विपक्षीय वेतन समितीची स्थापना केली आहे, मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट आर्थिक संकटात असल्यामुळे, या समितीमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचा समावेश करू नये, असे पत्र मुंबई पोर्ट ट्रस्टने केंद्र सरकारला पाठविल्यामुळे गोदी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता, त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन या दोन कामगार संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार आज इंदिरा गोदीतील आंबेडकर भवनसमोर गोदी कामगारांनी प्रचंड निदर्शने केली.
याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के शेट्ये यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मुंबई पोर्ट ट्रस्टची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टचा पगारवाढीच्या समितीमध्ये समावेश करू नये, असे केंद्र सरकारला लिहिणारे चेअरमन मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच पाहिले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टची परिस्थिती नाजूक असली तरी पोर्ट ट्रस्टकडे हजारो कोटींची जमीन आहे, जमिनीच्या विकासातून पोर्ट ट्रस्टला चांगले उत्पन्न मिळू शकते. गोदी कामगार न्याय मिळेपर्यंत लढा देतील. युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पोर्ट ट्रस्टचे प्रकल्प, जमिनीचा विकास, आयात निर्यातीचा माल, भाडे या स्वरूपात पोर्ट ट्रस्टला चांगले उत्पन्न मिळू शकते, मुंबई पोर्ट ट्रस्टने पाठविलेले पत्र ताबडतोब परत घ्यावे, अन्यथा बंदर व गोदी कामगार लवकरच संपावर जातील. ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त केरशी पारेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुंबई पोर्ट ट्रस्टने केंद्र सरकारला पाठविलेले बेकायदेशीर पत्र ताबडतोब परत घ्यावे, अन्यथा गोदी कामगार उपोषण, संप अशी लोकशाही मार्गाने आंदोलन करतील. मुंबई पोर्ट ट्रस्टचे हॉस्पिटल डी. वाय. पाटील चालविणार नसून मुंबई पोर्ट ट्रस्टच चालवेल, अशी मी खात्री देतो.ही आंदोलनाची सुरवात असून कामगार व त्यांचे कुटुंबीय असे वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन किंवा संप लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी निवृत्ती धुमाळ यांची निदर्शकाना मार्गदर्शनपर भाषणे झाली. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे, प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव, उपाध्यक्ष अहमद काझी, निसार युनूस,संदीप कदम,शीला भगत, शशिकांत बनसोडे, खजिनदार विकास नलावडे,ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे,विनोद पितळे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी राजाराम शिंदे यांनी केले तर आभार खजिनदार कल्पना देसाई यांनी मानले.निदर्शनामध्ये दोन्ही युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गोदी कामगार प्रचंड संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!