ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मविआ महिलांना दरमहा ३ हजार देणार – महिलांना मोफत एसटी प्रवास पंचसूत्री जाहीर

मुंबई – महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले. यावेळी महाविकास आघाडीकडून ५ मोठी आश्वासनं देण्यात आली. आगामी काळात जनतेने महाविकास आघाडीला सर्वाधिक मतदान करुन सरकार स्थापन करुन दिलं तर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात या ५ योजना जाहीर करणार आहे. यातील पहिलं आश्वासन हे महालक्ष्मी योजनेचं आहे. या योजनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 3 हजार रुपये आणि बसप्रवास मोफत करणार आहे. विशेष म्हणजे दुसरी घोषणा देखील तेवढीच मोठी आहे. राज्य सरकार प्रत्येक कुटुंबाला २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देणार आहे तसेच मोफत औषधे देखील देणार आहे. या योजनेचं नाव कटुंब रक्ष योजना असं देण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीकडून राज्याच्या जनतेला तिसरी जी गॅरंटी देण्यात आली ती समानतेची हमी अशी देण्यात आली आहे. या माध्यामतून महाविकास आघाडी आपलं सरकार आल्यास राज्यात जातनिहाय जनगणना करणार आहे. तसेच राज्यातील ५० टक्के आरक्षण हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मविआने आश्वासन दिलं आहे.
शेतकऱ्यांसाठी देखील महाविकास आघाडीने मोठं आश्वासन दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं तर सर्व शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी देऊ, असं मविआने जाहीर केलं आहे. तसेच शेतकऱ्यांना नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातील, असंही मोठं आश्वासन देण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीने यावेळी बेरोजगार तरुणांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना महाविकास आघाडीचं सरकार आल्यास दर महिन्याला ४ हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन महाविकास आघाडीकडून देण्यात आलं आहे.

error: Content is protected !!