मुंबई विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली दिंड्या- पताकांचे भार, घोड्याचे गोल रिंगण
मुंबई (प्रतिनिधी ): श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने निघणारा 23 वा पाडुरंगाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विठू नामाच्या गजराने संपूर्ण मुंबई दुमदुमली. यावेळी पंढरीनाथ महाराज तावरे यांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर अमृताश्रम महाराज जोशी यांना हैबतबाबा वारकरी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन ह.भ.प. शामसुदंर महाराज सोन्नर यांनी केले.
श्री प्रबोधन महासमितीच्या वतीने गेल्या 23 वर्षा पासून पाडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. काॅटनग्रीन राम मंदिरापासून सुरू होणा-या या सोहळ्याची सांगता संतसंमेलनाने माटुंगा पाच मैदान येथे होते. आज सकाळी काॅटनग्रीन राम मंदिर येथून निघालेल्या दिंड्या विठूनामाचा गजर करीत काळाचौकी लालबाग, परळ, भोईवाडा मार्गे माटुंगा पाच मैदान येथे पोहचल्या. शेकडो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पाच मैदानात घोड्याच्या गोल रिंगण उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्री यांच्या अध्यक्षतेखाली संत संमेलन पार पडले. या संत संमेलनात पंढरीनाथ महाराज तावरे यांना वारकरी रत्न, अमृताश्रम महाराज यांना हैबतबाबा वारकरी सेवा, तर विकासानंद महाराज मिसाळ यांना दैनिक सामनाच्या प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वारकरी संतांनी भजन-कीर्तनातून समाज जागृतीचे काम केले. तोच वारसा श्री वारकरी प्रबोधन महासमिती मुंबई सारख्या माया नगरीत चालवत आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट असल्याचे पंढरीनाथ महाराज तावरे म्हणाले. आळंदी-पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये जो आनंद उत्साह दिसतो, तीच अनुभूती आज अनुभवता आली, असे गौरवोद्गार डाॅ. विकासानंद महाराज मिसाळ यांनी काढले.
यावेळी ह भ प श्री ज्ञानेश्वर कदम गायनाचार्य मुंबई.श्री विजय जी अभंग व श्री सुभाष कदम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर .श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ मारवाडी वाडी परेल शिवडी,श्री विठ्ठल रखुमाई भजन मंडळ घाटला चेंबूर,व प्रति पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर दिंडी वडाळा या दिंड्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक रामेश्वर महाराज शास्री यांनी केले तर सर्वांचे स्वागत संस्थेचे सचिव नाना निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. आभार श्री बळवंत महाराज आवटे खजिनदार यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अशोक सुर्यवंशी, विश्वस्त बाबा मिसाळ, विलास घुले,श्री बाजीराव टेकवडे, श्री शंकर पानसरे,श्री राम भजन मंडळ काॅटनग्रीन, न्यू सातारा समूह यांनी विशेष प्रयत्न केले.