लतादीदींबद्दलचे गैरसमज त्यांच्या हयातीत दूर झाले ही सुखावणारी बाब ; बोरीवली येथे गानसम्राज्ञीला भावपूर्ण श्रद्धांजली !
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या बद्दल ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर ऐतिहासिक गीताच्या निर्मिती नंतर झालेला गैरसमज त्यांच्या हयातीत दूर होणे, ही त्यांच्या आयुष्यातील सुखावणारी बाब म्हणावी लागेल, लतादीदी या शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी आपल्या सर्वांच्या आयुष्यात स्वररुपाने त्या सदैव आपल्यात आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नयन कदम, करण मेनन, कुणाल माईणकर यांच्या पुढाकाराने ओबेरॉय स्कायसिटी समोर दत्तपाडा मार्गावर स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रख्यात साहित्यिक मीना वैशंपायन, उद्योजक उल्हास वैशंपायन, प्रख्यात चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार भारत कदम, नगरसेविका आसावरी पाटील, एअर इंडिया च्या माजी अधिकारी मीना इंगळे नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. योगेश वसंत त्रिवेदी यांनी लतादीदींचे खरे नांव हेमा होते परंतु पिताश्री दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘लतिका’ या नाटकावरुन लता हे नांव रुढ झाले, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या गेल्या चाळीस वर्षांपासून सुरु असलेल्या वसंत व्याख्यानमालेत ख्यातनाम सुसंवादिनी मंगलाताई खाडिलकर यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांच्या चरित्राचा उल्लेख करुन ऐ मेरे वतनके लोगो हे ऐतिहासिक आणि अजरामर गीत कसे निर्माण झाले याची सविस्तर माहिती दिली आणि त्यात सुमन कल्याणपूर यांच्याकडून संगीतकार सी. रामचंद्र यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गाण्यासाठी तयारी करवून घेतली पण ऐनवेळी लतादीदींकडून हे गाणे गाऊन घेतले. यात लतादीदींचा कोणताही दोष नव्हता या शब्दांत सुमनताईंनी दीदींना दोषमुक्त केले. ही बाब गेल्या सहा महिन्यापूर्वीची आहे. याचाच अर्थ दीदींच्या हयातीत हा मोठा गैरसमज दूर होणे ही लतादीदी आणि सुमनताई यांच्या चाहत्यांसाठी सुखावणारी बाब आहे. दिलीप ठाकूर यांनी लतादीदीच्या आयुष्यातील विविध घटनांचा उल्लेख करुन आपण खरोखरीच भाग्यवान आहोत, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. भारत कदम यांनी आपल्या आयुष्यात सकाळी उठण्यापासून रात्री झोप लागेपर्यंत लतादीदींच्या गाण्याभोवतीच आपण फिरत असतो, भूपाळी असो, जागो रे जागो रे पासून तर अंगाई गीतापर्यंत सर्वत्र लता लता आणि लतामय असे आपले जीवन व्यापलेले असते, अशा शब्दांत दीदींना श्रद्धांजली वाहिली. जनरल करीअप्पा उड्डाण पुलाजवळ भारतीय जनता पक्षाच्या विद्यमाने श्रद्धांजली चा कार्यक्रम नगरसेविका आसावरी पाटील यांनी आयोजित केला होता. कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या सह अनेक मान्यवरांनी मेणबत्त्या प्रज्वलित करुन आणि दीदींच्या तसबिरी समोर पुष्पांजली अर्पण करुन या महान गायिकेला आदरांजली वाहिली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक चौदा तर्फे धरमवीर ठाकूर यांनी विशेष चित्रफीत तयार केली होती. वॉर्ड अध्यक्ष वेंकटेश क्यासाराम, शाम कदम, स्वप्नील सागवेकर, जयेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पंडित ह्रुदयनाथ मंगेशकर, थोर व्यंगचित्रकार, शिवसेना नेते राज ठाकरे यांच्या साक्षीने, संगीतकार अनिल मोहिले यांच्या संगीत संयोजनाखाली ‘ऐ मेरे वतनके लोगो’ हे मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत लतादीदींनी गायिलेले अजरामर गीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता दीदींच्या दरम्यान झालेला संवाद, या संवादाचा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये प्रकर्षाने केलेला उल्लेख लतादीदींनी गायिलेली विविध गाणी यांचा अत्यंत कौशल्याने धरमवीर ठाकूर यांनी आपल्या चित्रफीतीत समावेश केला आहे.