विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार
मुंबईतील विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बदलण्यात येणार आहे. विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची सोमवारी पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.
विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. या पुतळ्याबाबत काही आमदारांनी आक्षेप नोंदवले होते. त्यानंतर पुतळा बदलण्याची मागणी करण्यात येत होती. आता हा पुतळा बदलण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सगळ्या आमदारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाते. अर्थसंकल्पाच्या दिवशी सत्ताधाऱ्यांकडून अभिवादन करण्यात येते.
सध्या विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. मात्र, महाराज बसलेले सिंहासन महाराजांच्या पुतळ्यापेक्षा मोठे आहे. त्याशिवाय, महाराजांच्या पुतळ्यावरचे भाव, तेज कमी दिसत असल्याने प्रभावी वाटत नसल्याचा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला होता.