केजरीवाल यांची अटक योग्यच आहे – दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मंगळवारी दिल्ली हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेविरोधात केजरीवालांनी कोर्टात धाव घेतली होती.
अरविंद केजरीवालांची ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून अटक वैध असल्याची टिपण्णी केली आहे. कोर्टाने म्हटलं की, हे जामिनाचं प्रकरण नाही तर अटकेला आव्हान आहे. सोबतच कोर्टाने म्हटलं की, अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर ईडीच्या रिमांडला अवैध म्हणता येणार नाही.
कोर्टाने म्हटलं की, ईडीचं म्हणणं आहे की, आतापर्यंतच्या पुराव्यांवरुन गोवा निवडणुकीत ४५ कोटी रुपये खर्च केले गेले. केजरीवाल हे पक्षाचे संयोजक आहेत. यानंतर केजरीवालांच्या वकिलांनी याचा विरोध केला. त्यांनी शरद रेड्डी आणि राघव मुंगता यांच्या विधानाचा उल्लेख केला. त्यावर कोर्टाने म्हटलं की, सरकारी साक्षीदार ठरवण्याचा निर्णय कोर्ट करतं, तपास यंत्रणा ते ठरवत नाही.
अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सोबत लोकशाही, निष्पक्ष निवडणुका आणि समान संधीसहीत संविधानाच्या तत्त्वांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं.