महादेव ऍप मध्ये सिने सृष्टीतील जुगार – रणवीर,श्रद्धा आणि काही निर्माते इडी चां रडारवर
मुंबई :महादेव बेटिंग अॅप प्रकरणी आता इडीने चित्रपट सृष्टीतील जुगारी लोकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. काल मुंबईतील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसवर छापा टाकला. कुरेशी प्रॉडक्शन हाऊसने चित्रपट बनवण्यासाठी महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून हवाला पैसे घेतले होते. त्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी भागात ईडीने छापे टाकले. दरम्यान, महादेव बेटिंग अॅपच्या प्रसिद्धीसाठी काम करणारे अनेक बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारवर आहेत.
कुरेशी प्रॉडक्शन हाऊस वसीम आणि तबस्सुम कुरेशी चालवतात. सध्या हे प्रॉडक्शन हाऊस बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध कलाकाराला घेऊन बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट बनवत आहेत. हा चित्रपट प्रादेशिक भाषेत बनवला जात असून तो इतर अनेक भाषांमध्ये डब करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी कुरेशी प्रॉडक्शन हाऊसने महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून आर्थिक मदत मागितल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, महादेव बेटिंग अॅप प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने अभिनेता रणबीर कपूरची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली. याशिवाय कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणात श्रद्धा कपूर आणि टीव्ही अभिनेत्री हिना खान यांचीही नावे जोडली गेली आहेत. महादेव बेटिंग अॅपच्या प्रमोशनसाठी काम करणारे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत.