ट्विटरच्या खरेदीनंतर ‘मस्क’ चीच कसोटी !
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तित गणना होत असलेल्या अमेरिकेतील ईलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यानंतर काही दिवसातच त्या कंपनीतील हजारो कामगार व अधिकारी यांना घरचा रस्ता दाखवला. खरं तर एखाद्या मालकाने कोणती तरी कंपनी नव्याने खरेदी केली की त्याचा रुबाब दाखवण्यास तो प्रारंभ करतो. ईलॉन मस्कन हेच केलं. आता ट्विटर ही कंपनी किती मोठी आहे हे पहावयाचे झाले तर आज त्यांचे कर्मचारी ७ हजार ५०० च्या घरात तर ग्राहक वर्ग २४ कोटींच्या घरात आहे. त्यांचे गेल्या तिमाहीतील उत्पन्न १.२ बिलीयन डॉलर्स इतके होते. मात्र याच तिमाहीतील तोटा ३४ कोटी डॉलर्स च्या घरात होता. त्यामुळे एखाद्या मालकाने कंपनी बाबत घेतलेला निर्णय आर्थिक दृष्ट्या योग्य असू शकेलही. तरीही मस्क यांनी कामगार कपातीद्वारे किंवा ज्या पद्धतीने कंपनीचा जाहीर अवमान केला त्याचा फटका मस्क यांच्यासह कंपनीचे कर्मचारी व लाखो गुंतवणूकदारांना बसला आहे. मस्क यांनी ४४ बिलीयन डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम ओतून ही कंपनी खरेही केली . २०२१ या वर्षात या कंपनीचे जेवढे उत्पन्न होते त्याच्या तब्बल ८.७ पट रक्कम मस्क याने मोजली. खरं तर त्याने खरेदी बाबत अव्यापारेषु व्यवहार केला आहे हे नक्की. तो स्वतः मोठ्या कर्जाच्या विळख्यात आहे. व्याजापोटी प्रचंड पैसे तो मोजतोय त्यामुळे त्याचा पाय या खरेदीपोटी आणखी खोलात जाऊ शकतो किंवा तो त्यात बुडू शकतो . यातील एक महत्वाची गोष्ट अशी की भारतात त्याचे १0 टक्के ग्राहक आहेत.
आता मस्क यांनी जे काही निर्णय घेतले त्यामागे काही धोरण भूमिका आहे. ते स्वतः काहीसे उजव्या विचार सरणीचे आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ट्विटरच्या एकूण उत्पनापैकी ८५ टक्के उत्पन्न केवळ जहिराती पोटी आहे. डेटा लायसन्स व अन्य उत्पन्न केवळ १५ टक्के आहे. त्यामुळे मस्क यांनी कंपनींचे उत्पन्न वाढविण्यासाठी काही धोरणं आखली त्यात कामगार कपात हा सोपा, पहिला मार्ग स्विकारला. काल काही निवडक कामगारांना मेल धाडून पुन्हा माघारी बोलावले हो गोष्ट वेगळी. त्याचबरोबर ग्राहकांसाठी काही शुल्क घेण्याचे जाहीर केले. ट्विटरचे खाते उघडणाऱ्या ग्राहकांची तपासणी ( व्हेरिफाईड) करण्यासाठी दरमहा ८ डॉलर इतके शुल्क आकारण्याचे त्यांनी जाहीर केले. भारतासह अन्य देशांमध्य ते लागू केले जाणार आहे. आज त्यांच्या २४ कोटी ग्राहकांपैकी केवळ ४ लाख २३ हजार खातेदार तपासलेले आहेत. ज्यांची अधिकृत तपासणी केली आहे व जे शुल्क देतील त्यांना जास्त सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. त्यांना ब्लू टिक शब्द वापरला आहे. सध्या तेथे फुकटे जास्त व शुल्क देणारे कमी अशी स्थिती ‘ आहे. ते बदलण्याचे काम किंवा प्रयत्न मस्क करीत आहेत. हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो या बद्दल साशंकता आहे.
जगातील या सर्वात मोठ्या मायक्रो ब्लॉगिंग कंपनीच्या माध्यमाचा (फ्लॅटफॉर्म) दररोज २३ ते २४ कोटी ग्राहक वापर करतात पण कंपनीचा खर्च त्यातून भागत नाही. मस्क हे काही ट्विटरचे पहिले मालक नाहीत आजवर अनेक मालक झाले. त्यामुळेच ही कंपनी, तिची विश्वासार्हता, ती चालवण्याची पद्धती याबाबत गुंतवणूकदार वर्गात साशंकता आहे. अन्य स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत या कंपनीचे मूल्यांकन कमी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीची नफा कमवण्याची क्षमता खूप मर्यादित आहे. गेल्या ५ वर्षात त्यांना अल्प नफा झाला. २०२१ मध्ये तर चक्क तोटा झाला होता. खूप चांगला नफा मिळवण्याची या कंपनीची क्षमता जाणवत नाही त्यामुळेच मस्क काही धाडसी निर्णय घेतात असे वाटते . सध्या या कंपनीला दररोज ४० लाख डॉलर इतका तोटा होत आहे. त्यामुळेच त्यांनी कामगार कपातीचा निर्णय घेतला. यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की २०१८ मध्ये या कंपनीत ३९२० कर्मचारी होते. २०२१ च्या अखेरीस तो आकडा ७५०० वर . अल्फाबेट किंवा मेटा या स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत यांचे उत्पन्न निम्म्याने कमी आहे. कामगार कपातीमुळे त्यांचे दरवर्षी ४० कोटी डॉलर्स वाचणार आहेत.
ही कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रात फार मोठी गणली जात नाही स्वतः संशोधन करण्याऐवजी त्यांनी इतर कंपन्या खरेदी करून स्वतःचे साम्राज्य उभे करण्याचा आजवर प्रयत्न केला . त्यामुळे उत्पादकता व कार्यक्षमता हे गंभीर प्रश्न मस्क यांना भेडसावणाऱ आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीला यश मिळेलच याची काहीही खात्री देता येणार नाही. त्यांना जाहिरातदारांचा भविष्यात कितपत प्रतिसाद मिळतो ते ही महत्वाचे आहे. जगभरात उद्योजक कुटुंबांनी चालवलेल्या कंपन्यांचं वर्चस्व आहे. वानगीदाखल सांगावयाचे झालं तर आशिया खंडात सुमारे ७५ टक्क कुटुंबं मालकी व व्यवस्थापन दोन्ही पहातात. अनेक सार्वजनिक क्षेत्रातील किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यां पेशा त्यांची कामिरी सर्वाधिक चांगली आहे. त्यांच्या तुलनेत इलॉन मस्क चीतुलना केली तर तो जुन्या काळातील मालकांसारखा नाही. तो नव्या जमान्यातील तंत्रज्ञान समृद्ध मालक आहे. कंपनीचे मालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे संबंध लक्षात घेतले तर त्यात मालकांच्या कडेच झुकत माप असते . कंपन्यांचे संचालक मंडळ कितीही सशक्त किंवा बलवान असले तरी कंपनी नफ्यात आणणे व कंपनीने सामाजिक भान जपणे यात मस्क कितपत यशस्वी होईल हे पहाणे महत्वाचे ठरेल. त्यांनी केलेली कामगार कपात अपेक्षित होती. . पण शुल्का बाबत फुकटे व पैसे देणारे ग्राहक असे दोन वर्ग त्यांनी केले. कारण ब्लू टीक वाले ग्राहक पैसेवाले, समाजातील प्रतिष्ठित, विश्वासार्ह असून त्यांना पाठीराखे जास्त मिळतील अशी ही योजना आहे. . स्वतः च्या हौसेखातर घेतलेला हा रेस चा घोडा आहे. हा छंद त्याची काय स्थिती करतो ते पहाणे अभ्यासपूर्ण ठरावे.
सर्वात महत्वाचे म्हणजे या टिटवरचा वापर जगभरातील प्रमुख राजकीय नेते, पुढारी करतात. त्यांच्या भाषण व अभिव्यक्ती . स्वातंत्र्याचा मुद्दा जगभर चर्चेत आहे. त्या बाबत मस्क ची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळेच त्याच्या या धारिष्ट्याला यश लाभते किंवा कसे हे पहाणे मनोरंजक ठरेल. दरम्यान मस्कला मास्टोडॉन च्या रुपाने एक नवा प्रतिस्पर्धी उभा रहात आहे . सोशल मिडीया मधील स्पर्धा आणखी तीव्र होत जाईल हे निश्चित.
(प्रा. नंदकुमार काकिर्डे)