ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अठरा वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा करा : शंकरबाबा पापळकर

मुंबई, : अनाथाश्रमातून 18 वर्षांवरील मुलांना काढून टाकलं जातं. त्यानंतर त्या मुलांच्या आयुष्याची वाताहत होते. त्यामुळे देशातील 18 वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना ते त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. शंकरबाबा पापळकर यांनी आज केली.

मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात आज आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे होते. दै. पुढारीचे कार्यकारी संपादक श्री.विवेक गिरधारी हे देखील याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी श्री. वाबळे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन श्री. पापळकर यांचे स्वागत केले.

‘अनाथांचे बाबा’ म्हणून सुप्रसिद्ध असलेले श्री. शंकरबाबा पापळकर अत्यंत तळमळीने आपले मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले की, डोंगरी येथील बाल सुधारगृह, आशा सदन यासारख्या संस्थांतून 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलामुलींचे काय झाले, याचा रेकॉर्ड 1957 पासून उपलब्ध नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. 18 वर्षे वय झालेल्या युवक-युवतींना अक्षरश: वाऱ्यावर सोडले जाते. त्यांना अनाथ आश्रमातून हाकलून दिले जाते. मुलींची अवस्था तर अत्यंत वाईट असते. त्यांना बाजारात विकले जाते. हे सारे थांबवायचे असेल तर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने 18 वर्षांवरील अनाथांना अनाथआश्रमात कायम ठेवण्यासाठी कायदा केला पाहिजे.

केंद्र सरकारने दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग स्थापन करून वर्षाला रु. 1000 कोटींची तरतूद केली आहे. पण हा पैसा जातो कुठे? हे समजत नाही, अशी खंत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, मी सुरू केलेले `वझ्झर’ मॉडेल हे 18 वर्षांवरील अनाथांसाठी उत्कृष्ठ मॉडेल आहे. आपल्या वझ्झर (ता. अचलपूर, जि. अमरावती) या अनाथालयात बालगृहातील 133 मुला-मुलींच्या आजीवन पुर्नवसनाची सोय आपण केली असून या सर्व मुलांच्या बाबाचे नाव शंकरबाबा पापळकर आहे. ही मुले बेवारस, दिव्यांग आणि बहुविकलांग आहेत. त्यापैकी 24 मुलींचे आपण लग्न लावले असून 13 मुलींना सरकारी नोकरी लाभली आहे. सर्व मुलांना बँकेमध्ये जनधन योजनेचा लाभ मिळाला असून संस्थेच्या परिसरात 15000 वृक्षांची लागवड करून आम्ही एक इतिहास निर्माण केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुरुवातीस किमान राज्यपातळीवर 18 वर्षांवरील अनाथांसाठी कायदा करण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ व इतर पत्रकार संघटनांनी राज्य सरकारवर दबाव आणावा, असे कळकळीचे आवाहन देखील श्री. शंकरबाबा पापळकर यांनी केले.

error: Content is protected !!