लाडक्या बहिणी साठी केंद्राची विमा सखी योजना
।नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आता नवीन योजना आणत आहेत. पंतप्रधान मोदी यासाठी विमा सखी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ९ डिसेंबर रोजी हरियाणामधील पानीपतमध्ये पंतप्रधान मोदी विमा सखी योजनेची सुरुवात करतील. या योजनेत भारतीय जीवन विमा निगमची महत्त्वाची भूमिका राहील. विमा सखी योजने अंतर्गत महिलांना मासिक वेतनही दिले जाईल.
इ कॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जीवन विमा निगमचा हा उपक्रम१८ ते ७० वर्षाच्या महिलांना सशक्त बनवण्यासाठी आहे. हा उपक्रम त्या महिलांसाठी आहे, ज्या दहावी पास आहेत. आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पहिले तीन वर्ष विशेष प्रशिक्षण आणि मानधन दिलं जाईल.
या योजनेअंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विक्रीचे प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्या आपल्या उत्पन्नात वाढ करतील आणि समाजात आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३५ हजार महिलांचा समावेश केला जाणार आहे
अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे की, प्रशिक्षणानंतर त्या एलआयसी प्रतिनिधी म्हणून काम करू शकतात आण पदवीधर विमा सखींना जीवन विमामध्ये विकास अधिकारी म्हणून पात्र होण्याची संधी मिळेल. विमा सखी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी(Modi) भावी विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्र देखील वितरीत करतील.
एल आयसीच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, विमा सखींना पहिल्याच वर्षी एकूण ८४ हजार रुपयांचे मानधन दिले जाईल. यानंतर दुसऱ्याचवर्षी ही रक्कम ७२ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षात ६० हजार रुपये असेल. तीन वर्षांत एलआयसी एकूण २ लाख १६ हजार रुपयांचे मानधन विमा सखींना देईल. याशिवाय विमा पॉलिसी विक्री करण्यात यशस्वी ठरणाऱ्या महिलांना अतिरिक्त कमीशनचा लाभ होईल. विमा सखी म्हणून काम करणाऱ्या महिलांना अनेक प्रकारचे लाभ मिळतील, ज्याद्वारे त्या आपल्या कुटुंबाला आणि समाजात अधिक सन्मान आणि आत्मनिर्भरता प्राप्त होईल