शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या – राज ठाकरे
मुंबई: मोदी सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांच्या घोषणेचा पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. केंद्र सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुस्कार घोषित करावा, असे राज ठाकरे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं. देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.’, असे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता मोदी सरकार राज ठाकरे यांची ही मागणी मान्य करणार का, हे पाहावे लागेल.
तत्पूर्वी शुक्रवारी केंद्र सरकारने आणखी तीन जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. यामध्ये कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने लालकृष्ण अडवाणी आणि कर्पुरी ठाकूर या नेत्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता.
