ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीयविश्लेषण

‘मराठी भाषे’ला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळण्यासाठी अमराठी खासदाराचा ‘संघर्ष

‘ ; महाराष्ट्राने मला भरपूर दिल्याची गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांची कृतज्ञता !

भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी जोरदार आवाज उठवला. मला महाराष्ट्राने खूप काही दिले आहे, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करतांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही, असे गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत ठणकावून सांगितले. भारतीय जनता पक्षाचे नेते रामचंद्र दामोदर उर्फ राम नाईक हे उत्तर मुंबई मतदारसंघातून अनेक वर्षे लोकसभेत निवडून गेले. रामभाऊ उत्तर प्रदेश चे राज्यपाल झाल्यानंतर बोरीवली मतदारसंघाचे आमदार गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांना रामभाऊ नाईक यांचे उत्तराधिकारी म्हणून लोकसभेत जाण्याची संधी नरेंद्र मोदी यांच्या लाटेत २०१४ साली मिळाली. २०१९ मध्ये सुद्धा गोपाळराव जबरदस्त मताधिक्याने निवडून आले. २००४ आणि २००९ च्या पराभवाचा वचपा गोपाळरावांनी काढला. गोपाळ शेट्टी हे दहिसर, बोरीवली, चारकोप, कांदिवली, मालाड भागात उद्यानसम्राट म्हणून ओळखण्यात येतात. मग पोयसर जिमखाना असो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान असो, बोरीवली पूर्वेला डिस्कव्हरी समोरचे उद्यान असो, कुसुमभारती आणि कंट्री पार्क मधील उद्यान असो की माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ बोरीवली पश्चिमेला उभारण्यात आलेले अटल स्मृती उद्यान असो ही सर्व उद्याने गोपाळ शेट्टी यांनी उभारुन भारतीय जनता पक्षाच्या मजबुतीसाठी’मशागत’ केली. परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी गोपाळ शेट्टी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जे भाषण केले त्या घणाघाती भाषणात त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी आपण २०१६ पासून सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा करीत असल्याचे नमूद केले किंबहुना ही मागणी मान्य होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आपल्याच सरकारला दिला. गोपाळ शेट्टी यांचे भाषणाचा गोषवारा पाहू या ! केंद्र सरकारने संस्कृत, तेलगू, तामिळ, कन्नड तसेच मल्याळम ह्या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर उमटते व भाषेच्या विकासाला अधिक चालना मिळते या मुळेच मराठी भाषेला “अभिजात भाषेचा दर्जा ” मिळालाच पाहिजे यासाठी एक अमराठी खासदार सन २०१६ पासून सातत्याने लोकसभेत व लोकसभेच्या बाहेर देखील आवाज उठवत आहे त्या अमराठी खासदाराचे नाव आहे “गोपाळ चिनय्या शेट्टी”. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी २०१३ पासून सरकारी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र तसेच राज्य सरकारने यासाठी समित्यांची स्थापना केली असून तसा प्रस्ताव देखील केंद्र सरकार च्या दरबारी पडून आहे परंतु या समित्यांद्वारे होत असलेला अभ्यास व संशोधन खूपच अपुरे असल्याची खंत खारदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली. गोपाळ शेट्टी खासदार झाल्यानंतर सातत्याने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया बरोबर व संबंधित सन्माननीय मंत्रीमहोदयां बरोबर त्यांनी पत्रव्यवहार सुरु ठेवला आहे. प्रसंगी कधी शून्य प्रहरात देखील त्यांनी आवाज उठवला आहे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला पुन्हा एकदा मराठी भाषेला अभिजात दर्जा केव्हा मिळणार ? असा प्रश्न संसदेत उपस्थित केला आहे. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री श्री.राम मेघवाल यांनी मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील व कार्यरत असल्याचे आश्वासन खासदार शेट्टी यांच्या सह संपूर्ण संसदेला दिले आहे. मला महाराष्ट्राने खूप काही दिले असून त्यासाठी कुठल्याही परिस्थितीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळे पर्यंत शांत बसणार नसल्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोलतांना सांगितले. महाराष्ट्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले. मंत्रिमंडळ बैठकीत ठराव मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र विधिमंडळात प्रस्ताव एकमताने संमत करुन केंद्र सरकार दरबारी पाठविले. शिवसेनेचे सर्व खासदार यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी एका अमराठी खासदाराने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून संसदेत आवाज बुलंद करावा, याची नोंद घ्यावी लागेल हे निश्चितच. भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई मधील एक जबाबदार पदाधिकारी सुधीर परांजपे यांनी गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांच्या लोकसभेतील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी केलेल्या भाषणाची चित्रफीत पाठविली. तसेच त्यांच्या भाषणाचा गोषवारा सुद्धा दिला. या महत्वपूर्ण बाबीला साथ देण्यासाठी हे एक पाऊल मी उचलले. हा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या कामाचा संपूर्ण आढावा नाही, तो त्यांच्या अहवालात येईलच. केवळ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा म्हणून त्यांनी केलेल्या एका भाषणाची ही ऐतिहासिक नोंद आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या आणि मराठी भाषेला मावशी मानणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या नजरा लागल्या आहेत आणि ती अपेक्षा सार्थकी लागावी हीच भावना प्रत्येक मराठी माणसाची आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना २०१४ पासून मोठे भाऊ मानले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांचे. मोठे भाऊ असल्याचे देवेंद्रांनीच जाहीर केले आहे. त्यामुळे भाऊबंदकी करण्याऐवजी भावाभावांचे प्रेम दाखवावे आणि निदान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राजकीय जोडे बाजूला ठेवून लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सर्वच्या सर्व खासदारांनी एकजूट दाखवायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने निवडणूक लढविणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी हे आपले सर्वप्रथम कर्तव्य असल्याची खूणगाठ मनाशी बांधून यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. आई तुळजाभवानी यश दिल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र ! जय जिजाऊ, जय शिवराय !!-

योगेश वसंत त्रिवेदी,

error: Content is protected !!